US Presidential Election 2024 : डोनाल्ड ट्रम्पचीही गॅरंटी.! वाचा भारत आणि भारतीयांबद्दल काय म्हणाले?
US Presidential Election 2024 Donald Trump Interview : सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीत जो बायडन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरीस या राष्ट्रपतीपदाच्या उमे्दवार असल्याचे घोषित करण्यात आले त्यानंतर त्यांनी निवडणुकीची धुरा हाती घेतली. प्रभावी ठरतील हे एवढे वाटले नव्हते पण त्या डोनाल्ड ट्रम्प यांना चांगल्याच टक्कर देत आहेत.
विशेष म्हणजे त्यांचे भाषणही प्रभावी होत आहे. या धर्तीवर आता अमेरिकेतली निवडणूक रंगात आली असतानाच एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरीस या वाईट राष्ट्रपती ठरतील असे वक्तव्य केले तसेच त्यांनी भारताबद्दल काय वाटतं हे सांगत जर राष्ट्रपती झाल्यास भारताबद्दल धोरण काय असेल यावरही त्यांनी आपले मत व्यक्त केलं.

..तर कमला हॅरीस वाईट राष्ट्रपती ठरतील
डोनाल्ड ट्रम्प यांनी दैनिक भास्करला मुलाखत देताना त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले की,"कमला हॅरिस या अत्यंत वाईट राष्ट्रपती ठरतील हे अमेरिकन जनतेला माहीत आहे. कॉम्रेड कमला हॅरिस अमेरिकन लोकांच्या खिशातून पैसे काढतील, तर मी त्यांच्या खिशात हजारो डॉलर्स टाकणार आहे."
भारतीयांबद्दल काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची दुसरी संधी जर मिळाली तर भारतासाठी काय प्लॅन आहे ..या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारतीय अमेरिकन माझे समर्थक आहेत. गेल्या निवडणुकीतही मला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. अमेरिकेत भारतीयांची मोठी संख्या आहे. याचे कारण म्हणजे त्यांची अतुलनीय प्रतिभा. माझ्या निवडणूक प्रचारात सहभागी असलेले भारतीय खूप मेहनत घेत आहेत. माझ्या भारत दौऱ्यात माझे केलेले स्वागत मला अजूनही आठवते.
पीएम मोदींसोबत दुसऱ्या इनिंगमध्ये काम करण्यास इच्छुक
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "मी हमी देतो की व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष म्हणून भारतीयांना माझ्यापेक्षा चांगला मित्र असू शकत नाही. मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बर्याच काळापासून ओळखतो, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत पुढे जात आहे. मी पीएम मोदींसोबत त्यांच्या दुसऱ्या डावात काम करण्यास उत्सुक आहे."
अमेरिकेत मी भारतीयांचे स्वागत करतो..
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, माझा बेकायदेशीर स्थलांतरासंदर्भात तीव्र दृष्टिकोन आहे. अध्यक्ष या नात्याने मी अवैध स्थलांतरितांवर कठोर कारवाई केली. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की मी कायदेशीर स्थलांतरितांचे, विशेषतः भारतीयांचे स्वागत करतो. मी अलीकडेच म्हटले आहे की अमेरिकेत पदवीधर झालेल्या भारतीय आणि इतर परदेशी विद्यार्थ्यांना स्वयंचलित मार्गाने ग्रीन कार्ड मिळावे. म्हणजेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी सर्व सुविधा मिळाव्यात.
दोन कोटी घुसखोरांना बाहेर काढणार
कमला हॅरिस यांच्या स्थलांतर धोरणामुळे जगातील तुरुंगांतील गुन्हेगार आणि दहशतवादी सीमा ओलांडून अमेरिकेत येत आहेत. घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही कारवाई झालेली नाही. हे घुसखोर अमेरिकेत जंगल राजवट निर्माण करत आहेत. मी राष्ट्रपती होताच दोन कोटी घुसखोरांना बाहेर काढणार आहे. कमला हे करू शकली नाही आणि करू शकत नाही असेही शेवटी ट्रम्प म्हणाले.
..तर इस्त्रायलचा विनाश निश्चित
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास-इस्त्रायल युद्धावर भाष्य केलं. ते म्हणाले की, कमला निवडणुकीत जिंकल्या तर इस्रायलचा विनाश निश्चित आहे. खरे तर डेमोक्रॅट हे हमासचे समर्थक आहेत. त्यांचे मोठे नेते पॅलेस्टाईनच्या नावाने हमासचा प्रचार करतात. सध्या अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलिस ठेवलेल्यांची वर्षभरानंतरही सुटका झालेली नाही. या ओलीसांमध्ये अनेक अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications