..तर अमेरिकेत जाण्यावर लागेल कायमस्वरुपी बंदी; US embassyने व्हिसाच्या मुदतीवरुन दिला कडक इशारा
US issues stern warning to foreigners overstaying visas : भारतातील अमेरिकन दूतावासाने शनिवारी परदेशी नागरिकांना व्हिसावर दिलेल्या मुदतीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहिल्यास त्याचे प्रवाशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा कडक इशारा दिला आहे.
शनिवारी, दूतावासाने X वर पोस्ट करून हा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांतील हा तिसरा इशारा असल्याचे देखील सा्ंगितले जात आहे. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, जर तुम्ही तुमच्या अधिकृत मुदतीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहिलात तर तुम्हाला हद्दपार केले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेत प्रवास करण्यावर कायमस्वरूपी बंदी येऊ शकते.

अमेरिकेत प्रवेश करताना प्रवाशांना सादर केलेल्या I-94 फॉर्मवर राहण्याची परवानगी असलेला कालावधी सामान्यतः दर्शविला जातो. तो एखाद्या व्यक्तीला देशात किती काळ राहण्याची परवानगी आहे हे दर्शवितो.
दूतावासाने सूचित केले की थोड्या काळासाठी राहिल्यानेही गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे अमेरिकेत अभ्यास, काम किंवा कुटुंबातील सदस्यांशी सामील होण्याच्या दीर्घकालीन आकांक्षांना धक्का बसू शकतो.
ज्या लोकांना विलंब होत आहे आणि ते वेळेवर निघू शकत नाहीत, त्यांना दूतावासाने शिफारस केली आहे की, त्यांनी दंडाशिवाय त्यांचा मुक्काम वाढवण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी शक्य तितक्या लवकर युनायटेड स्टेट्स सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ला संपर्क साधावा.
H-1B व्हिसा नोंदणी कमी
दरम्यान, अलीकडील USCIS च्या डेटानुसार, आर्थिक वर्ष (FY) 2026 साठी H-1B वर्क व्हिसा नोंदणीमध्ये 27% घट झाली आहे. USCIS मध्ये 343,981 पात्र नोंदणी होत्या, जी आर्थिक वर्ष 2025 साठी 470,342 नोंदणींपेक्षा लक्षणीय घट आहे.
ही घसरण अर्ज शुल्कात झालेल्या वाढीशी संबंधित असल्याचे मानले जाते. बायडेन प्रशासनाच्या नवीन नियमांमुळे, H-1B नोंदणीसाठी अर्ज शुल्क $10 वरून $215 पर्यंत वाढले आहे.
यापूर्वी अमेरिकन दूतावासाने दिला होता इशारा
विशेष बाब म्हणजे, मे महिन्याच्या सुरूवातीला देखील भारतातील अमेरिकन दूतावासाच्या हँडलवरून आणखी एका संबंधित पोस्टमध्ये असे म्हटले होते की, "अमेरिकन सरकारने फसवणूक रोखण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतर संपवण्यासाठी समन्वित आंतर-एजन्सी प्रयत्न सुरू केले आहेत.
व्हिसा फसवणुकीत दोषी आढळणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात येईल. बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती आणि परदेशी सरकारांना नवीन व्हिसा निर्बंध धोरणे लागू केले जातील, असाही इशारा त्यांनी दिला होता.












Click it and Unblock the Notifications