ट्रम्पांच्या शांतीच्या प्रयत्नांना खीळ! रशियाचा 629 क्षेपणास्त्र अन् ड्रोनचा वर्षाव, 'कीव' हादरले!
Russia-Ukraine War : रशियाने युक्रेनची राजधानी कीववर २८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण हल्ला केला त्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. रात्रभर केलेल्या ६२९ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या वर्षावामुळे कीव शहरात हाहाकार माजला. या हल्ल्यात ३ मुलांसह १४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४८ जण गंभीर जखमी झाले.

नागरिकांवर जाणूनबुजून हल्ला
रशियन हवाई दलाने ५९८ शाहिद ड्रोन आणि ३१ क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनने यातील बहुतांश शस्त्रे पाडली असली तरी, ४० हल्ल्यांनी शहरातील २० हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त केली.
या हल्ल्यात पाच मजली निवासी इमारती पूर्णपणे कोसळल्या, शॉपिंग मॉल्सचे मोठे नुकसान झाले आणि युरोपियन युनियनच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यानंतर कीव शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेले मृतदेह पाहून बचाव कर्मचारीही सुन्न झाले होते.
एका स्थानिक रहिवाशाने आपल्या वेदना व्यक्त करताना सांगितले, "काचेचे तुकडे हवेत उडत होते. बॉम्बच्या आवाजाने आम्हाला ओरडायला भाग पाडले. या हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी २९ ऑगस्ट हा शोकदिन म्हणून घोषित केला आहे.
शांतता चर्चांना मोठा धक्का
हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने शांतता चर्चा सुरू होत्या. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्यास नकार दिला. पुतिन यांची डोनेत्स्क प्रदेश सोडण्याची आणि नाटोपासून दूर राहण्याची अट युक्रेनने फेटाळून लावल्याने शांततेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला 'नागरिकांची जाणूनबुजून केलेली हत्या' म्हटले आहे. त्यांनी जगाला रशियावर कडक निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे. "रशियाला शांतता नको, त्यांना फक्त रक्त हवे आहे," असे ते म्हणाले. दुसरीकडे, युरोपीय देशांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, फ्रान्सच्या अध्यक्षांनी याला 'दहशतवाद आणि बर्बरता' असे संबोधले आहे.
युक्रेनचे प्रत्युत्तर!
रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेननेही त्वरीत प्रत्युत्तर दिले. त्यांनी रशियाच्या क्रास्नोडार आणि समारा प्रदेशातील दोन मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमधून युक्रेनने रशियाची युद्ध अर्थव्यवस्था कमकुवत करण्याची आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
हा केवळ शस्त्रांचा संघर्ष नाही, तर राजनैतिक प्रयत्न आणि इच्छाशक्तीचाही कस पाहणारा संघर्ष आहे. एकीकडे शांततेच्या चर्चा आणि दुसरीकडे असे भीषण हल्ले, यामुळे या युद्धाचा शेवट नेमका कसा होईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जग रशियाला या हल्ल्यांसाठी जबाबदार धरेल की कीवच्या रस्त्यांवरचा आक्रोश वाया जाईल, हे येणारा काळच ठरवेल.












Click it and Unblock the Notifications