पुतिन यांच्या निवासावर 91 ड्रोन्सचा थरार! रशियाचा युक्रेनवर आरोप; झेलेन्स्कींनी फेटाळले;युद्ध पेटणार
Putin residence drone attack : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. रशियाने सोमवारी असा खळबळजनक दावा केला आहे की, युक्रेनने थेट राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोवगोरोडमधील सरकारी निवासस्थानाला लक्ष्य करत ९१ ड्रोन्सने हल्ला केला. रशियाने याला 'दहशतवादी कृत्य' म्हटले असून, युक्रेनने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत रशिया केवळ हल्ल्याचे निमित्त शोधत असल्याची टीका केली आहे.

रशियाचा दावा: "९१ ड्रोन्सचा हल्ला निष्फळ"
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांच्या माहितीनुसार, २८ आणि २९ डिसेंबरच्या मध्यरात्री युक्रेनने हा मोठा ड्रोन हल्ला घडवून आणला. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे सर्व ९१ ड्रोन्स हवेतच पाडल्याचा दावा रशियाने केला आहे.
लाव्हरोव यांनी इशारा दिला की, "रशिया या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल. आम्ही बदला घेण्यासाठी वेळ आणि लक्ष्य दोन्ही निश्चित केले आहे." विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी पुतिन निवासस्थानी होते की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे आणि रशियाने अद्याप या घटनेचा कोणताही अधिकृत व्हिडिओ जारी केलेला नाही.
झेलेन्स्कींचे प्रत्युत्तर: "हल्ल्याचा बहाना शोधण्यासाठी रचलेली कथा"
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे सर्व आरोप 'मनगडंत' असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. "रशियाला कीवमधील सरकारी इमारतींवर आणि मंत्रिमंडळाच्या कार्यालयांवर मोठा हल्ला करायचा आहे, त्यासाठीच हा खोटा बनाव रचला जात आहे," असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. त्यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत स्पष्ट केले की, युक्रेन नेहमीच राजनैतिक मार्गाने शांततेसाठी प्रयत्नशील आहे, मात्र रशिया युद्ध संपवण्यास नकार देत आहे.
ट्रम्प यांना धक्का आणि शांतता चर्चेतील अडथळे
रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, पुतिन यांनी स्वतः अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून या हल्ल्याची माहिती दिली. या घटनेमुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसल्याचे समजते. विशेष म्हणजे, ही घटना घडण्यापूर्वीच फ्लोरिडामध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात युद्ध संपवण्याबाबत तीन तास चर्चा झाली होती.
१५ वर्षांची सुरक्षा हमी की ५० वर्षांची?
झेलेन्स्की यांनी उघड केले की, शांतता कराराचा भाग म्हणून अमेरिकेने युक्रेनला १५ वर्षांच्या सुरक्षा हमीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, झेलेन्स्की यांनी रशियाला भविष्यात पुन्हा आक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी ५० वर्षांच्या हमीची मागणी केली आहे.
शांतता चर्चेतील प्रमुख अडथळे
- सैन्य माघार : कोणत्या देशाने कोणत्या प्रदेशातून सैन्य मागे घ्यावे, यावर अद्याप एकमत नाही.
- झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प : युरोपमधील या मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचे भविष्य काय असेल, हा सर्वात मोठा पेच आहे.
- नाटो (NATO) सैन्य: रशियाने स्पष्ट केले आहे की, युक्रेनच्या भूमीवर नाटो सैन्याची उपस्थिती त्यांना कदापि मान्य नाही.












Click it and Unblock the Notifications