ऋषी सुनक यांच्यासमोर यावेळी विजयाचे आव्हान
मुंबई- युनायटेड किंगडममध्ये सध्या मतदान सुरू आहे. येथे गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाला मजूर पक्षाचे नेते केयर स्टारर यांनी यावेळी कडवे आव्हान दिले आहे. युकेतील काही ओपिनियन पोलने मजूर पक्षाला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, सुनक पुन्हा सत्तेत येतील का याबाबत अंदाज बांधले जात आहेत.
युकेतील निवडणुकीत अनेक ओपिनियन पोलमध्ये मजूर पक्षाला 650 पैकी 400 पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत. स्वतः ऋषी सुनक यांनाही स्वतःची जागा मिळवता येणार नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. सुनक यांची सत्ता यावेळी जाण्याची भिती अनेकांनी व्यक्त केली आहे.
कधी जाहीर होतील निकाल
यूके निवडणुकीचे निकाल भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीनंतर 2:30 वाजता येण्यास सुरुवात होईल. बहुतेक मतदारसंघांचे निकाल शुक्रवारी सकाळी अपेक्षित आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पक्षाला 326 जागांचे बहुमत आवश्यक आहे. रात्री 11:30 च्या अंदाजे वेळेत निकाल जाहीर करणारे ब्लिथ आणि ॲशिंग्टन हे पहिले मतदारसंघ असण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर बॅसिल्डन आणि बिलेरिके यांचा क्रमांक लागतो. अंतिम निकाल शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान लागतील असा अंदाज आहे.
निवडणुकीत या प्रश्नांची चर्चा
2016 मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी मतदान झाल्यापासून ब्रिटन आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या, ब्रिटीश मतदारांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचे खालावत चाललेले जीवनमान आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 11.1% च्या शिखरावर पोहोचल्यानंतर मे मध्ये महागाई दर 2% पर्यंत घसरला आहे. परंतु, लोकांचे उत्पन्न कमी होत चालले आहे. जुलै 2021 पासून अन्नधान्याच्या किमती 20 टक्क्यांहून अधिक राहिल्या आहेत. हेच मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारातही चर्चेत आले.












Click it and Unblock the Notifications