"तुमचा जीव वाचवा...": मादुरोंच्या अटकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशाच्या पंतप्रधानांना थेट धमकी!
Donald Trump Threatens Colombia After Maduro Arrest in US : अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना एका नाट्यमय लष्करी कारवाईत अटक करून न्यूयॉर्कच्या तुरुंगात डांबल्यानंतर आता लॅटिन अमेरिकेतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. परंतु, आता ट्रम्प या ठिकाणीच थांबलेले नाहीत. त्यांनी आता आपला मोर्चा शेजारील कोलंबिया देशाकडे वळवला. तिथल्या राष्ट्राध्यक्षांना उघडपणे धमकी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पश्चिम गोलार्धात अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाची भीती निर्माण झाली आहे.

कोलंबियाला उघड धमकी: "सावध राहा!"
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "पेट्रो कोकेन तयार करून अमेरिकेला पाठवत आहेत, त्यामुळे त्यांनी आता स्वतःचे जीव वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे," असे प्रक्षोभक विधान ट्रम्प यांनी केले.
पेट्रो यांनी मादुरोवरील कारवाईला "लॅटिन अमेरिकेच्या सार्वभौमत्वावर हल्ला" असे म्हटले होते, ज्याचा प्रत्युत्तर ट्रम्प यांनी या धमकीने दिले आहे. कोलंबियातील ड्रग्ज प्रयोगशाळांवर अमेरिका हवाई हल्ले करण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे.
व्हेनेझुएलाचे भवितव्य: ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन'
मादुरो आणि त्यांच्या पत्नीला सत्तेवरून खेचल्यानंतर व्हेनेझुएला नेमके कोण चालवणार? यावर ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे:
तात्पुरता ताबा : जोपर्यंत सुरक्षित आणि न्याय्य पद्धतीने सत्तेचे संक्रमण होत नाही, तोपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचे प्रशासन स्वतःच्या ताब्यात ठेवेल.
तेल आणि अब्जावधींची गुंतवणूक : ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिकेतील महाकाय तेल कंपन्या व्हेनेझुएलात पाठवल्या जातील. तिथल्या खराब झालेल्या पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले जातील. "आम्हाला स्वतःसाठी तिथली प्रचंड ऊर्जा आणि स्थिरता हवी आहे," असे ट्रम्प यांनी प्रांजळपणे कबूल केले.
नौदल सज्ज : व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून अमेरिकन नौदल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी 'स्टँडबाय'वर आहे.
देशांतर्गत राजकारण: मारिया मचाडो की डेल्सी रॉड्रिग्ज?
ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतर्गत नेतृत्वावरही भाष्य केले आहे. त्यांनी धक्कादायकपणे उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यावर विश्वास व्यक्त केला, तर लोकप्रिय विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "मचाडो यांना देशात पुरेसा पाठिंबा आणि आदर नाही, त्यांच्यासाठी नेतृत्व करणे कठीण जाईल," असे ट्रम्प यांनी नमूद केले.
पुढचे लक्ष्य: मेक्सिको आणि क्युबा?
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी दिलेल्या संकेतांनुसार, क्युबा हे ट्रम्प प्रशासनाचे पुढचे लक्ष्य असू शकते. "मी जर हवानामध्ये (क्युबाची राजधानी) सरकारमध्ये असतो, तर मला नक्कीच काळजी वाटली असती," असे रुबियो म्हणाले.
दुसरीकडे, मेक्सिकोबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, तिथल्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम चांगल्या आहेत, पण देश त्या नाही तर 'ड्रग्ज कार्टेल' चालवत आहेत. मेक्सिकोने नकार दिला असला तरी, अमेरिका तिथल्या कार्टेलचा नायनाट करण्यासाठी लष्करी कारवाई करण्यास उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी सुचवले आहे.
अमेरिकन वर्चस्वाची पुनरावृत्ती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे १९ व्या शतकातील 'मनरो डॉक्ट्रीन'ची (ज्यात अमेरिका पश्चिम गोलार्धात इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप खपवून घेत नव्हती) आठवण करून दिली आहे. "पश्चिम गोलार्धातील अमेरिकेच्या वर्चस्वावर आता कोणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही," या ट्रम्प यांच्या विधानाने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की, अमेरिका आता आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या बदलांसाठी सज्ज झाली आहे.












Click it and Unblock the Notifications