जागतिक स्तरावर मोठी घडामोड! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना थेट फोन; लवकरच घेणार 'हा' निर्णय
Trump Putin Agree to Meet in Budapest : युक्रेन आणि रशिया यांच्यातील गेली तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्याच्या दिशेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी काल, गुरुवारी (१६ ऑक्टोबर) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी थेट फोनवरून सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी जाहीर केले की, दोन्ही नेते लवकरच युरोपातील हंगेरी या देशाची राजधानी बुडापेस्ट येथे भेट घेण्यास सहमत झाले आहेत. या भेटीचा उद्देश 'अशोभनीय' ठरलेले हे युद्ध तातडीने संपुष्टात आणणे हा असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
उभय देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा 'उत्कृष्ट' झाली असून बुडापेस्टमध्ये त्यांच्यात बैठक होणार आहे. दरम्यान, युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या महत्त्वपूर्ण संभाषणाची माहिती दिली.

ट्रम्प यांचे वक्तव्य
ट्रम्प यांनी सांगितले की, पुतिन यांच्यासोबत फोन कॉलवर "उत्कृष्ट संभाषण" झाली आहे आणि दोघांनी बुडापेस्टमध्ये भेट घेण्यावर सहमती दर्शवली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश "रशिया आणि युक्रेन दरम्यान चालू असलेले हे 'अशोभनीय' युद्ध संपवणे" हा आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी आपले म्हणणे ट्रुथ वर मांडले.
चर्चेनंतर पुतिन यांची प्रतिक्रिया काय?
पुतिन यांच्याकडून या भेटीच्या तारखेबाबत किंवा स्थळाबाबत कोणतीही तात्काळ सार्वजनिक प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, रशियन वृत्तसंस्थांनी पुतिन आणि ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
चर्चेेचे प्रमुख विषय काय पुढची रणनिती कशी असेल?
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील या सुमारे दोन तास चाललेल्या फोन कॉलमध्ये युक्रेनमधील युद्धविरामासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगतात.
वाणिज्य आणि व्यापार
- युक्रेन युद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील व्यापारावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
- नुकतेच ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टॉमहॉक क्रूझ मिसाईल देण्याची धमकी दिली होती, या संवेदनशील शस्त्रास्त्रांच्या विक्रीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
- पुतिन यांच्या सल्लागारांनी यापूर्वी या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती.
पुढील पाऊल काय?
ट्रम्प यांनी सांगितले की, युक्रेनसोबत युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी पुढील आठवड्यात उच्च-स्तरीय सल्लागारांची बैठक आयोजित केली जाईल. अमेरिकेकडून या प्रारंभिक बैठकांचे नेतृत्व परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो करण्याची शक्यता आहे.
युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांशी ट्रम्प आज भेटणार
डोनाल्ड ट्रम्प यांची पुतिन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, आज, शुक्रवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये त्यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी भेट होणार आहे. या भेटीत ट्रम्प, पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेचा आढावा घेतील आणि युक्रेनला आवश्यक शस्त्रे, विशेषत: टॉमहॉक मिसाईल, मिळवण्याच्या मागणीवर चर्चा करतील.












Click it and Unblock the Notifications