डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा? रशिया-युक्रेन बैठकीनंतर टॅरिफ मागे घेण्याचे संकेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे झालेल्या तीन तासांच्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी भारतासाठी एक मोठे विधान केले आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर लावलेला अतिरिक्त २५ टक्के सेकंडरी टॅरिफ मागे घेण्याबाबत आपण विचार करत असल्याचे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले.

ट्रम्प यांचा निर्णय भारतासाठी दिलासादायक
जर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला, तर तो भारतासाठी मोठा दिलासा ठरू शकतो. याआधी ट्रम्प प्रशासनाने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा टॅरिफ २८ ऑगस्टपासून लागू होणार होता, ज्यामुळे भारतीय वस्तूंवरील एकूण टॅरिफ ५० टक्के होणार होता. पण ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामुळे हा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, "मी येत्या एक-दोन आठवड्यांत अतिरिक्त टॅरिफबाबत निर्णय घेऊ शकतो." मात्र, त्याचवेळी त्यांनी एक धक्कादायक दावाही केला. "मी सेकंडरी टॅरिफ मागे घेऊ शकतो, कारण भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे रशियाने एक मोठा ग्राहक गमावला आहे," असे ट्रम्प म्हणाले.
दुसरीकडे, भारत सरकारने ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला न जुमानता रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. एका अहवालानुसार, भारतीय सरकारी तेल कंपन्या दररोज सुमारे २० लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करत आहेत. त्यामुळे, ट्रम्प यांच्या दाव्यामागे नेमका काय उद्देश आहे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.












Click it and Unblock the Notifications