अमेरिकेचा सीरियात हवाई हल्ला, अल कायदाचा टॉप दहशतवादी ठार, जाणून घ्या आता नवे राष्ट्रपती कोण ?
US Air Strike in Syria: अमेरिकन सैन्याने गुरुवारी (ता.29) जानेवारीला वायव्य सीरियामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात अल-कायदाशी संबंधित दहशतवादी गटाच्या एका वरिष्ठ सदस्याला ठार मारलं आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड (CENTCOM) नुसार दहशतवादी संघटनांना कमकुवत करण्यासाठी आणि त्यांच्या धोक्यांना दूर करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून हा हल्ला करण्यात आला.
या कारवाईत हुर अल-दीन ग्रुपचा दहशतवादी मुहम्मद सलाह अल-जबीरला लक्ष्य करण्यात आलं, ज्यामध्ये तो ठार मारला गेला आहे. सेंटकॉमचे कमांडर जनरल मायकेल एरिक कुरिला म्हणाले की, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना मारण्याची किंवा पकडण्याची मोहीम अमेरिका सुरूच ठेवेल.

सीरियातील सत्तापालट, अहमद अल-शारा हंगामी अध्यक्ष
सीरियामध्ये एक मोठा राजकीय बदल दिसून आला आहे. बशर अल-असद यांची राजवट संपली आहे. अहमद अल-शारा यांना देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. इस्लामी बंडखोर युती हयात तहरीर अल-शाम (HTS) ने गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी बशर अल-असद यांना सत्तेवरून हाकलून लावलं होतं.
सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार लष्करी अधिकारी हसन अब्देल घानी यांनी घोषणा केली की अहमद अल-शारा आता सीरियाचे नेतृत्व करतील आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर देशाचे प्रतिनिधित्व करतील.
हमासने आपला कमांडर मोहम्मद देईफच्या मृत्यूची पुष्टी केली
पॅलेस्टिनी संघटना हमासने गुरुवारी त्यांचे सर्वोच्च लष्करी कमांडर मोहम्मद देईफ यांच्या मृत्यूची पुष्टी केली. इस्रायलने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद देईफला मारल्याचा दावा केला होता, परंतु हमासने आतापर्यंत त्याची पुष्टी केलेली नाही.
हमासने उप-लष्करी कमांडर मारवान इस्सा याच्या मृत्यूची घोषणाही केली, ज्याची पुष्टी अमेरिकेने गेल्या वर्षी मार्चमध्ये केली होती. इस्रायली लष्कराने (IDF) 13 जुलै 2024 रोजी मोहम्मद देईफवर हवाई हल्ला केला, जो आता अधिकृतपणे यशस्वी मानला जातोय.












Click it and Unblock the Notifications