SCO परिषदेत मोदी-जिनपिंग आमनेसामने: सीमा, व्यापार-दहशतवादावर चर्चा; पाकिस्तानची वाढली चिंता!
sco summit 2025 : चीनमधील तियानजिन येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होत आहे. २०१८ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असल्यामुळे, या भेटीकडे केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, विशेषतः अमेरिका आणि पाकिस्तानची याकडे बारीक नजर आहे.

गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच थेट भेट
२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत करण्यासाठी मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, शी जिनपिंग स्वतः मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे स्वागत करणार आहेत, ज्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे टप्पे
ही परिषद अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेने भारत, चीन आणि रशियावर व्यापार युद्ध सुरू केलं आहे. अमेरिकेने भारतावर ५०%, रशियावर २५% आणि चीनवर २००% पर्यंत अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. या परिस्थितीत, SCO व्यासपीठ अमेरिकेच्या या धोरणांविरुद्ध एकजूट दाखवण्यासाठी एक उत्तम संधी आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनही या परिषदेत सहभागी होत आहेत. त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे ते त्यांचे दोन मोठे तेल खरेदीदार देश, भारत आणि चीन यांच्याशी संवाद साधू शकतील. ट्रम्प प्रशासनाचा दबाव असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे, ज्यामुळे भारत-रशिया संबंधांना बळकटी मिळाली आहे.
पाकिस्तानसाठी मोठा 'धक्का'
या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान देखील सहभागी झाले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर त्यांची ही पहिलीच थेट बैठक आहे. चर्चेचा मुख्य विषय व्यापार आणि आर्थिक सहकार्य असला तरी, सीमापार दहशतवादाचा मुद्दा देखील उपस्थित केला जाऊ शकतो.
जर चीनने पहलगाम हल्ल्यावर कोणतंही विधान केलं किंवा भारताच्या भूमिकेला समर्थन दिलं, तर ते पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. यासोबतच, पूर्व लडाखमधील सीमावाद आणि द्विपक्षीय आर्थिक संबंध पुन्हा मजबूत करण्यावरही दोन्ही नेते चर्चा करण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications