रशियासोबत 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी युक्रेन तयार, अमेरिकेने दिला आहे प्रस्ताव
Russia Ukraine War : मागील तीन वर्षापासून सुरु असलेलं युक्रेन-रशिया यांच्यातील युध्द काही दिवसासाठी थांबणार आहे. मंगळवारी युक्रेनने रशियासोबतच्या तीन वर्षांच्या युद्धात पहिल्यांदाच युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. सौदी अरेबियामध्ये अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेनने रशियासोबत 30 दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे की, आता ते या प्रस्तावासह रशियाला जातील आणि ते मॉस्कोने ठरवायचे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच अमेरिका युक्रेनच्या मदतीने गुप्तचर माहितीची देवाणघेवाण पुन्हा सुरू करेल.

दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या जाहीर वादानंतर (ता. 11 मार्च) रोजी मंगळवारी जेद्दाह येथे झालेली चर्चा ही दोन्ही देशांमधील पहिली अधिकृत बैठक होती. याठिकाणी युक्रेनच्या प्रतिनिधींनी अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यामध्ये तात्काळ 30 दिवसांचा युद्धविराम करण्याची मागणी करण्यात आली होती.
चर्चेत सहभागी असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, ते रशियासमोर हा प्रस्ताव मांडणार आहेत. हा निर्णय आता रशियाला घ्यायचा आहे". दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, आता रशियाला "सकारात्मक" प्रस्तावावर सहमती देण्यासाठी राजी करणे अमेरिकेचे काम आहे. झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे आभार मानण्यासाठी टेलिव्हिजनवर हजेरी लावली आणि सांगितले की युक्रेन शांतता शोधण्यासाठी वचनबद्ध आहे, जेणेकरून "युद्ध परत येऊ नये".
चर्चेनंतर व्हाईट हाऊसबाहेर माध्यमांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, "ही संपूर्ण युद्धबंदी आहे. युक्रेनने यावर सहमती दर्शविली आहे, आणि आता आशा आहे की रशियाही यावर सहमत होईल. आम्ही आज आणि उद्या त्यांच्याशी (रशियन प्रतिनिधींशी) भेटणार आहोत. आशा आहे की आपण एका करारावर पोहोचू शकू. मला वाटते की युद्धबंदी खूप महत्त्वाची आहे. जर आपण रशियाला ते करायला लावू शकलो तर ते खूप चांगले होईल. जर आपण ते करू शकलो नाही तर युद्ध चालूच राहील आणि खूप सारे लोक मरतील," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications