ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीदरम्यान हल्ल्याची तयारी?'; हा देश रचतोय कट; कोणी केला खुलासा!
Trump Putin Alaska meeting 2025 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बहुप्रतिक्षित बैठक 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कामध्ये होणार आहे. या बैठकीमुळे रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, या बैठकीच्या काही दिवस आधी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक धक्कादायक दावा केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयानुसार, युक्रेन सरकार या बैठकीत अडथळा आणण्यासाठी मोठा कट रचत आहे.

रशियाचा दावा
आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, युक्रेन सरकार 15 ऑगस्टच्या शिखर परिषदेला उधळण्याची तयारी करत आहे.
या षडयंत्रानुसार, युक्रेनची सुरक्षा सेवा खार्किवमधील चुगुएव्ह येथे परदेशी पत्रकारांचा एक गट पाठवणार आहे. हे पत्रकार सीमावर्ती भागातील रहिवाशांचे वृत्तांकन करण्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी उपस्थित राहतील.
रशियन मंत्रालयाचा दावा आहे की, त्यानंतर युक्रेनियन सैन्य शहरावर हल्ला करेल आणि त्याचे खापर रशियावर फोडेल. ही एक 'फाल्स फ्लॅग' कारवाई असेल, ज्यामध्ये युक्रेन आपल्याच लोकांना मारून रशियाला बदनाम करण्याचा डाव आखत आहे.
नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न
रशियन संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, या योजनेनुसार युक्रेनचे सशस्त्र दल मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी किंवा रुग्णालयावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची योजना आखत आहेत.
यानंतर, तिथे उपस्थित परदेशी पत्रकार तातडीने त्याचे वृत्तांकन करतील. या माध्यमातून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जाईल, आणि जागतिक स्तरावर रशियाची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीचे महत्त्व!
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुतिन यांना पहिल्यांदाच भेटत आहेत. ही भेट अशा वेळी होत आहे, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या देशांवर दंड लावला आहे. त्यामुळे, ही बैठक केवळ युद्धसमाप्तीसाठीच नव्हे तर जागतिक राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ट्रम्प यांनी 'सत्य सोशल'वर या बैठकीची घोषणा केली असून, या भेटीनंतर पुतिन आणि ट्रम्प यांची पुढील बैठक रशियामध्ये होईल, अशी आशा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सहाय्यक युरी उशाकोव्ह यांनी व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications