अबब! US$335 अब्ज संपत्ती, 330 कोटी रुपयांची नौका, एअरलाइनचे मालक... कसे आहेत कतारचे अमीर?
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सोमवारी दिल्लीला आले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. पीएम मोदी हे स्वतः विमातळावर स्वागतासाठी उपस्थित राहिल्याने कतारच्या अमीर यांची एकच चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे मोदींनी मिठी मारुन त्यांचे स्वागत केले. कतारचे हे अमीर कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे, हेच आपण या लेखात पाहूयात...

अमीर म्हणजे काय?
कतारचा सर्वोच्च शासक म्हणजे 'अमीर'असतो. कतार हा देश अस्तित्वात आल्यापासून तेथे ११ अमीर झाले. सर्वजण अल-थानी कुटुंबातील आहेत. शेख तमीम बिन हमद अल थानी यांना २०१३ मध्ये ही पदवी घेतली. शेख तमीम हे माजी अमीर हमद बिन खलिफा अल थानी यांचे चौथे पुत्र आहेत. जून १९८० मध्ये जन्मलेल्या शेख तमीम यांचे शिक्षण लंडनमधील प्रतिष्ठित हॅरो स्कूलमध्ये झाले. त्यांनी १९९८ मध्ये इंग्लंडमधील रॉयल मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली.
कतार सैन्यातही होते
शेख तमीम बिन हमद अल थानी हे इंग्लंडहून शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांना कतार सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. ४३ वर्षीय शेख तमीम २०१३ मध्ये अमीर बनले. जगातील सर्वात श्रीमंत शासकांच्या यादीत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी नवव्या क्रमांकावर आहेत. अल थानी कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे US$३३५ अब्ज इतकी आहे.
डोळे दिपवणारी संपत्ती
तमीम हे त्यांच्या कुटुंबासह दोहा रॉयल पॅलेसमध्ये राहतात. या राजवाड्याची किंमत सुमारे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. त्या राजवाड्यात १०० हून अधिक खोल्या, बॉलरूम आणि बरेच काही आहे. येथे एकाच वेळी सुमारे ५०० गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात एवढा मोठा हा राजवाडा आहे. दोहा रॉयल पॅलेसच्या काही भागांवर सोन्याचे कोरीवकाम देखील आहे. शेख तमीम यांच्याकडे जगातील सर्वात महागडी आणि आलिशान नौका आहे. त्याची किंमत ३.३ अब्ज रुपये आहे. ते १२४ मीटर उंच आहे आणि त्यात हेलिपॅड देखील आहे. यात एका वेळी ३५ पाहुणे आणि ९० क्रू मेंबर्स त्यात बसू शकतात.
स्वतःची आहे एअरलाईन्स
शेख तमीम बिन हमद अल थानी यांची स्वतःची एअरलाइन देखील आहे. 'कतार अमीरी एअरलाइन्स' १९७७ मध्ये सुरू झाली. जी फक्त राजघराण्यातील लोकांना सेवा देते. या विमान कंपनीकडे किमान १४ विमाने आहेत. ज्यात तीन बोईंग ७४७ विमानांचा समावेश आहे. शेख तमीमकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. बुगाटीपासून ते फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स-रॉइस इत्यादी, शेकडो आलिशान गाड्या त्यांच्याकडे आहेत. कतारचे अमीर तमीम यांना पाकिस्तानने निशान-ए-पाकिस्तान देऊन सन्मानित केले आहे.












Click it and Unblock the Notifications