पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक; कशी होते पोपची निवड? निवडीत भारत असतो का? वाचा संपूर्ण माहिती
रोममधील जेमेली रुग्णालयात सध्या ख्रिश्चन धर्माचे महान नेते ८८ वर्षीय पोप फ्रान्सिस हे दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोप फ्रान्सिस यांना दुहेरी न्यूमोनिया आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला गेल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. त्यांच्या प्रकृतीबद्दल वाढत्या चिंता सुरु असताना आता पुढील पोपच्या निवडीबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.

कशी होते पोपची निवड?
पोप यांची निवड पाच मोठ्या प्रक्रियेतून होते. पोपच्या राजीनाम्यानंतर किंवा मृत्यूनंतर ८० वर्षांखालील सर्व कार्डिनल व्हॅटिकन सिटीमध्ये एकत्र येतात. तेथेच बैठक होऊन निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. मतदार सिस्टिन चॅपलमध्ये प्रवेश करतात. तेथे गोपनीयतेची शपथ घेतात. तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक कार्डिनल त्यांच्या पसंतीच्या पोपचे नाव कागदी मतपत्रिकेवर लिहितो. जिंकण्यासाठी उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळवावे लागते. चौथ्या टप्प्यात, मतदानाच्या प्रत्येक फेरीनंतर मतपत्रिका जाळल्या जातात. काळा धूर म्हणजे कोणताही निर्णय झालेला नाही, तर पांढरा धूर म्हणजे नवीन पोप निवडला गेला आहे. पाचव्या टप्प्यात, नवीन पोपचे नाव जाहीर केले जाते. सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीत एक वरिष्ठ कार्डिनल दिसतात आणि "हॅबेमस पापम" (आमच्याकडे पोप आहे) अशी घोषणा करतात.
मतदानात भारतीयांचा सहभाग
पोप निवडणुकीत दोन भारतीय कार्डिनल्सना मतदानाचा अधिकार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत भारताची उपस्थिती महत्त्वाची ठरते. भारतातील सर्वात मोठ्या कॅथोलिक समुदायांपैकी एक असलेल्या सायरो मलबार कॅथोलिक चर्चचे प्रमुख आर्चबिशप जॉर्ज अलेन्चेरी व कार्डिनल्स कॉलेजमधील कार्डिनल जाँर्ज कुवाकड हे दोघे या निवडणुकी प्रक्रियेत भाग घेतील. जॉर्ज अलेन्चेरी हे सध्या ७९ वर्षांचे आहेत. पुढल्या वर्षी ते त्यांचा मतदानाचा अधिकार गमावतील. तर जॉर्ज कुवाकड हे सध्या ५१ वर्षांचे आहेत. गेल्या डिसेंबरमध्येच त्यांची नियुक्ती झाली.
केरळचे विशेष लक्ष
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती नाजूक असल्याने, व्हॅटिकन सर्व संभाव्य परिस्थितींसाठी तयारी करत आहे. जर पोप आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरले, तर कार्डिनल पॅरोलिन यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम कालावधी चर्चचे कामकाज सुरू ठेवतील. तथापि, नवीन पोप निवडल्याशिवाय कोणतेही मोठे धार्मिक निर्णय घेतले जाणार नाहीत. भारतातील सुमारे २ कोटी कॅथोलिक समुदाय या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा समुदाय विशेषतः केरळमध्ये आहे.
युरोपमधून ठरते पोपची निवड
भारतीय कार्डिनल्स मतदानात सहभागी होणार असले तरी, कार्डिनल्स कॉलेजमध्ये १२० हून अधिक मतदार आहेत. हे जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. युरोपमध्ये सर्वात मोठा मतदान गट आहे. त्यामुळे पोपच्या निवडीत युरोप महत्त्वाची भूमिका बजावते. कॅथलिक चर्च वेगाने वाढत असल्याच्या कारणाने लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी अधिक प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे. २०१३ मध्ये निवडून आलेले पोप फ्रान्सिस हे स्वतः लॅटिन अमेरिकेतून निवडून आलेले पहिले पोप होते.












Click it and Unblock the Notifications