पंतप्रधान मोदींचे पोलंडमध्ये मराठीत भाषण, फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ
Pm Narendra Modi : पोलंड आणि युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोलंडची राजधानी वॉर्सा येथे पोहोचले आहेत. पोलंडमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींचा मराठीत भाषण देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळेस मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचेही पाहायला मिळाले.
मोदी यांचा पोलंडमध्ये मराठीत बोलतानाचा व्हिडिओ शेअर करत फडवणीस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासित नागरिकांना महाराष्ट्राने दिलेला आश्रय आणि त्यातून महाराष्ट्राचा व भारताचा झळकलेला उदारमतवादी विचार, या साऱ्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच मैत्री आणि शौर्याचा वारसा! पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांची ऐतिहासिक 70 वर्षे असे देखील फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मोदी मराठीत काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रति पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वाधिक प्राधान्य आहे. पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडच्या महिला आणि मुलांना आश्रय दिला होता. तिथे सुद्धा एक फार मोठा कॅम्प तयार करण्यात आला होता. पोलंडच्या महिलांना आणि मुलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या लोकांना दिवस-रात्र एक करत काम केलं होतं," असंही मोदींनी भाषणामध्ये सांगितले.
When Hon PM Modi ji speaks Marathi in Poland !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2024
Thank you, Hon PM Narendra Modi Ji, for honouring and remembering Maharashtra’s rich legacy of supporting Polish refugees during World War II.
Honouring a Legacy of Friendship and Valour – Celebrating 70 Years of Diplomatic Ties… pic.twitter.com/Xktyo935mJ
स्मृतीस्थळालाही दिली भेट
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या दौऱ्यात वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअलला भेट दिली. या भेटीचे फोटो देखील त्यांनी एक्सवर शेयर केले आहे. यात त्यांनी वॉर्सा येथील कोल्हापूर स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली असल्याचं म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications