पंतप्रधान मोदींचे मॉरिशसमध्ये 'बिहारी'अंदाजात स्वागत, 'हा संबंध ऐतिहासिक आहे'- पंतप्रधान मोदी
PM Modi Mauritius Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवस मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसाच्या दौ-यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार केले जाणार आहेत. मॉरिशसमध्ये पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. येथे अनिवासी भारतीयांच्या गटातील महिलांनी पारंपारिक गाण्यांनी त्यांचे स्वागत केलं आहे.
मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी दोन्ही देशामध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करणार आहेत.

'इतिहास आणि खास नातेसंबंध
पंतप्रधान मोदी पोर्ट लुईस येथील हॉटेलमध्ये पोहोचताच अनिवासी भारतीयांनी त्यांचे 'भारत माता की जय' च्या घोषणा देऊन आणि तिरंगी ध्वजांनी स्वागत केलं. त्याच वेळी महिलांनी गाणी गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केलं. गीत गवई हे एक पारंपारिक भोजपुरी संगीत आहे, जे समूहात गायले जाते. हे गाणे भारतातील भोजपुरी प्रदेशातील महिलांनी मॉरिशसमध्ये आणलेल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहे. त्याचे सांस्कृतिक महत्त्व ओळखून गीत गवैनला डिसेंबर 2016 मध्ये युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समाविष्ट करण्यात आलं.
"मॉरिशसमधील भारतीय समुदायाने माझे केलेले खास स्वागत पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. भारतीय वारसा, संस्कृती आणि मूल्यांबद्दलची त्यांची खोल ओढ खरोखरच प्रेरणादायी आहे. इतिहास आणि हृदयाचे हे बंधन पिढ्यानपिढ्या जुने आहे," असे मोदी यांनी म्हटलं आहे.
अनिवासी भारतीय समुदायातील सदस्य दिव्या म्हणाल्या, "मी पंतप्रधान मोदींना भेटले. त्यावेळी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली. अशा कार्यक्रमात सहभागी होता येत आहे, याचा मला खूप आनंद आहे." अनिवासी भारतीय गटातील आणखी एक सदस्य सरस्वती म्हणाल्या, "येथे येऊन आपल्या पंतप्रधानांना भेटून खूप आनंद होत आहे. भारत आणि मॉरिशसचे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्हाला आशा आहे की पुढे ही ते वाढत राहतील..."
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नमस्ते मॉरिशस! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसमध्ये आगमन झालं आहे. विमानतळावर मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीन रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं आहे.
पंतप्रधान विविध कार्यक्रमांचा भाग असतील
पंतप्रधान मोदी पुढील दोन दिवसांत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. एका सामुदायिक कार्यक्रमाला मोदी संबोधित करणार आहेत. तसेच ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॉरिशसचे अध्यक्ष धरम गोखूल, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटतील आणि संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या एक्स या सोशल मिडीयाच्या पोस्ट म्हटले आहे की, "मॉरिशसला पोहोचलो आहे. विमानतळावर माझे स्वागत केल्याबद्दल माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचे आभार. आज मी राष्ट्रपती धरम गोखूल, पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांना भेटेन आणि संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करेन.", असं या सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications