तालिबानकडून पुन्हा पाकिस्तानवर लक्ष्य, चकमकीत एका कॅप्टनसह १० दहशतवाद्यांचा खात्मा
खैबर पख्तूनख्वा येथील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत पाकिस्तानी लष्कराचा एक कॅप्टन ठार झाला. तसेच बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनेशी संबंधित किमान १० दहशतवादीही ठार झाल्याची माहिती, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दिली आहे. परिसरात दहशतवादी असल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे गुरुवारी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानी कॅप्टन ठार
या चकमकीत पाकिस्तानचा कॅप्टन हसनैन अख्तर ठार झाला. लष्कराने दिलेल्या निवेदनात या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. लष्कराने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "हसनैन हा एक धाडसी अधिकारी होता. कॅप्टन अख्तर यांनी यापूर्वीही अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतला होता, असे सांगितले जात आहे. या कारवाईत १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे व त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लष्कराच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या परिसरात यापुढेही दहशतवाद्यांना लक्ष केले जाईल. या भागातील दहशत लवकरच संपुष्टात येईल, असेही सांगितले जात आहे.
तालिबानचा धोका वाढला
अफगाणिस्तानमध्ये २०२१ मध्ये पुन्हा तालिबान सत्तेत आले. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानच्या सीमावर्ती प्रांतांमध्ये, तालिबानने जास्त लक्ष घातले आहे. तालिबान सत्तेत आल्यापासून पाकिस्तानमध्येही दहशतवादी हल्ले वाढले आहे. पाकिस्तानी लष्कराला वारंवार लक्ष्य केले जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज (PICSS) या थिंक टँकने दिलेल्या एका आकडेवारीत मागील महिन्याच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी पाकिस्तानमधील हल्ले वाढल्याचे सांगितले गेले आहे.
आत्तापर्यंत ४६ हल्ले
खैबर पख्तूनख्वा हा सर्वात जास्त प्रभावित प्रांत राहिला आहे. त्यानंतर बलुचिस्तानचा क्रमांक लागतो. खैबर पख्तूनख्वाच्या वस्ती असलेल्या जिल्ह्यांमध्ये, दहशतवाद्यांनी २७ हल्ले केले. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. तसेच ११ सुरक्षा कर्मचारी, सहा नागरिक आणि दोन अतिरेकी यांचा मृत्यू झाला. खैबर पख्तूनख्वा या आदिवासी जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १९ हल्ले झाले. ज्यामध्ये १३ सुरक्षा कर्मचारी, आठ नागरिक आणि २५ अतिरेकी अशा ४६ जणांचा मृत्यू झाला.


Click it and Unblock the Notifications
