Pakistan : मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली असती, पण...
Pakistan News : पाकिस्तान सरकारच्या मदतीने व मोठ्या पाठिंबाने जगभर पसरवलेला दहशतवाद आता त्यांच्यासाठीच एक मोठी समस्या बनली आहे.
त्याचे झाले असे की, पाकिस्तानी हवाई तळावरच दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला केला जाणार होता. परंतु, पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी तो कट उधळून लावला. अन्यथा, दहशतवाद्यांच्या हातात जर पाकिस्तानच्या हवाई तळाचा ताबा गेला असता तर मोठा विनाश झाला असता.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मसरूर एअरबेसला लक्ष्य करायचे होते. हे काही सामान्य एअरबेस नाही. कारण, पाकिस्तानी हवाई दलाच्या या तळावर अणुबॉम्ब देखील ठेवले आहेत. पण हे षड्यंत्र उधळून लावण्यात आले आहे. शुक्रवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये ही माहिती समोर आली आहे. 'जंग' वृत्तपत्रातील वृत्तानुसार, गुप्तचर संस्थांनी या आठवड्यात छापे टाकले आणि मसरूर हवाई तळावर हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या नऊ संशयित दहशतवाद्यांना त्यांनी अटक केली.

अटक झालेल्यांमध्ये 5 जणांची ओळख पटली
पाकिस्तान सैन्याने अटक केलेल्या संशयितांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. हे पाच जण अफगाणिस्तानचे नागरिक आहेत. ज्यामुळे या कटाशी आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे दिसून आले आहे. या बातमीत गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हे दहशतवादी कराचीच्या बाहेरील भागात असलेल्या त्यांच्या गुप्त ठिकाणांमधून काम करत होते.
हे सर्वजण गेल्या एक महिन्यापासून मसरूर एअरबेसच्या आसपासच्या परिसरात राहून रेकी करत होते. तेथील सुरक्षा व्यवस्थेचे निरीक्षण करत होते. हे दहशतवादी सुमारे एक महिन्यापूर्वी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसले होते आणि तेव्हापासून ते त्यांचा धोकादायक कट राबवण्याच्या तयारीत होते.
टीटीपीने आखला होता एक प्लॅन
छाप्यादरम्यान गुप्तचर यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. तळावर विनाशकारी हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्याचा उद्देश केवळ तळाचे नुकसान करणेच नाही तर देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे देखील होते. या हल्ल्याच्या कटामागे तहरी-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) असल्याचा खुलासा अहवालात करण्यात आला आहे.
टीटीपीचा एक हाय प्रोफाइल दहशतवादी या योजनांचे नेतृत्व करत होता. त्यात म्हटले आहे की हा तोच दहशतवादी आहे. जो काही महिन्यांपूर्वी कराचीमध्ये एका चिनी नागरिकाची हत्या केल्यानंतर अफगाणिस्तानात पळून गेला होता. टीटीपीच्या दहशतवाद्यांनी 2011 मध्ये कराची येथील पाकिस्तानी नौदलाच्या हवाई तळावर, 2014 मध्ये कराची डॉकयार्डवर आणि त्याच वर्षी कराची विमानतळावर मोठे हल्ले केले.












Click it and Unblock the Notifications