इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला; लष्करी मुख्यालय उद्ध्वस्त
आज (बुधवारी) इस्रायलने सीरियाच्या लष्करी मुख्यालयावर जोरदार हल्ला केला आहे, ज्यामुळे आणखी एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीरियाची राजधानी दमास्कस येथील लष्कराच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्रायल डिफेन्स फोर्स (IDF) ने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर दिली आहे. या हल्ल्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.

ड्रुझ समुदायाचे संरक्षण हे प्रमुख कारण
गेल्या काही दिवसांपासून सीरियन लष्कर आणि ड्रुझ समुदायाच्या गटांमध्ये दक्षिण सीरियातील स्वैदा प्रांतात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात ड्रुझ समुदायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांच्या संरक्षणासाठी इस्रायलने थेट सीरियन लष्करी मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. इस्रायली सरकारने दिलेल्या निर्देशानुसार हा हल्ला करण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे. आता सीरिया यावर कशी प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्वैदा प्रांतातील हिंसक चकमकी
मिळालेल्या माहितीनुसार, सीरियाच्या दक्षिण स्वैदा प्रांतात गेल्या काही दिवसांपासून हिंसक चकमकी सुरू आहेत. सीरियन सुरक्षा दल आणि ड्रुझ मिलिशिया गट यांच्यात युद्धबंदी झाली होती, परंतु ती मोडण्यात आली. त्यानंतर सीरियन लष्कराने स्वैदा प्रांतात पुन्हा कारवाई सुरू केली, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी संघर्ष पुन्हा पेटला.
आज झालेल्या संघर्षात सीरियन सुरक्षा दलांनी अनेक नागरिकांची घरे जाळल्याचे वृत्त आहे. या संघर्षांमध्ये आतापर्यंत 2 लहान मुलांसह 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूणच, या संघर्षात 250 हून अधिक लोक मरण पावले असून, त्यात 138 ड्रुझ सैनिकांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने सीरियावर हल्ला केला आहे.
इस्रायलचा यापूर्वीचा हल्ला आणि भूमिकेची पुनरावृत्ती
कालही (मंगळवारी) इस्रायलने दक्षिण सीरियातील स्वैदा प्रदेशातील सीरियन सैन्य तळांवर हल्ला केला होता. त्यामागेही याच भागातील ड्रुझ समुदायाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या सीमेला लागून असलेल्या भागात शस्त्रे जमा होऊ नयेत, हा दुहेरी उद्देश होता.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी ड्रुझ समाजाचे रक्षण करण्याची ग्वाही दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "सीरियन सरकार स्वैदामध्ये शस्त्रास्त्रांसह पोहोचले होते, ती नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीरियाच्या ड्रुझ समुदायाशी आमचे खोल नाते आहे आणि आम्ही त्या समाजाचे रक्षण करणार आहोत."












Click it and Unblock the Notifications