VIDEO : इस्त्रायलने सीरियावर हल्ला केला; बॉम्बस्फोटात वृत्त निवेदिका थेट प्रक्षेपण सोडून पळाली
इस्त्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. इस्त्रायलने सीरियाच्या संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मुख्यालयाला लक्ष्य केले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात भीषण बॉम्बवर्षाव दिसून येत आहे. या बॉम्ब हल्ल्यादरम्यान एवढा मोठा धमाका झाला की, थेट टीव्ही शो करत असलेली वृत्त निवेदिका आपली खुर्ची सोडून पळून गेली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वृत्त निवेदिका इस्त्रायली हल्ल्यांची बातमी देत आहे आणि तिच्या मागे स्फोट होत आहेत. त्याचवेळी इतका मोठा स्फोट झाला की, त्याचा आवाज स्टुडिओमधील निवेदिकेपर्यंत ऐकू आला. तो आवाज ऐकून ती आपली खुर्ची सोडून स्वतःला वाचवण्यासाठी वेगाने पळताना दिसली. नंतर कॅमेऱ्यात तिची खुर्ची गोल फिरताना दिसली.
व्हिडिओमध्ये रिपोर्टर शांतपणे कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसत आहे, अचानक एक स्फोट होतो आणि तिच्या मागे एक इमारत उध्वस्त होते. स्फोटानंतर रिपोर्टर घाबरून खुर्चीवरून उठते आणि पळून जाते. एनडीटीव्हीनुसार, ज्या इमारतीत स्फोट झाला ती दमास्कसमधील सीरियाचे सरकारी टीव्ही भवन आहे.
हे दृश्य इराण आणि इस्त्रायल यांच्यातील अलीकडील १२ दिवसांच्या युद्धाची आठवण करून देते. अलीकडील इराणसोबतच्या युद्धात, इस्त्रायलने तेहरानमधील इराणच्या सरकारी प्रसारक आयआरआयबीच्या कार्यालयावर देखील थेट शो दरम्यान बॉम्बहल्ला केला होता, ज्यामुळे निवेदकाला प्रसारण मध्येच सोडून पळून जावे लागले होते.
इस्त्रायलने सीरियावर हल्ला केला
इस्त्रायलने बुधवारी सीरियाची राजधानी दमास्कसवर अचानक हल्ला केला. इस्त्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) ने सांगितले की, त्यांनी दमास्कसमधील सीरियाई शासनाच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला केला. आयडीएफने पुढे म्हटले की, "दमास्कसमधील लष्करी मुख्यालय हे असे ठिकाण आहे जिथे सीरियाई शासनाचे कमांडर युद्ध मोहिमांचे संचालन करतात आणि अस-सुवेदा प्रदेशात शासन दलांना तैनात करतात."
החלו המכות הכואבות pic.twitter.com/1kJFFXoiua
— ישראל כ”ץ Israel Katz (@Israel_katz) July 16, 2025
इस्त्रायली सैन्याने दमास्कसमधील सीरियाच्या राष्ट्रपती भवनाजवळच्या एका लष्करी तळावरही हल्ला केला. आयडीएफने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर म्हटले की, "आयडीएफ दक्षिण सीरियातील ड्रुझ नागरिकांविरुद्ध होत असलेल्या घटनांवर आणि शासनाच्या कारवाईवर सतत लक्ष ठेवून आहे. राजकीय स्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, आयडीएफ या प्रदेशात हल्ला करत आहे आणि विविध परिस्थितींसाठी तयार आहे."
एएफपीनुसार, एका इस्त्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, गाझा पट्टीत तैनात काही सैनिकांना सीरियाच्या सीमेवर पाठवले जाईल. एएफपीने लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, काही इस्त्रायली सैनिक गाझातून "सीरियाच्या आपल्या उत्तरेकडील सीमेवर तैनात होण्याची तयारी करत होते".












Click it and Unblock the Notifications