...तर आम्ही इराणच्या सुप्रीमो लीडर खामेनींना ठार मारले असते; इस्त्रायलच्या मंत्र्याने केला खुलासा!
Israel-Iran War Update, Ali Khamenei Marathi News : इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी गुरुवारी (26 जून) इराण-इस्रायल युद्धाबाबत मोठा खुलासा केला आहे. इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारण्याचा प्लॅन आखलेला होता. परंतु सैन्याला योग्य वेळ न मिळाल्याने हा प्लॅन अंमलात आला नाही. चॅनल-13 ला दिलेल्या मुलाखतीत इस्रायल काट्झ यांनी तसा दावा केला आहे.
..अन्यथा आम्ही त्यांना ठार केले असते..!
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, गेल्या 12 दिवसांच्या संघर्षादरम्यान आम्ही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती, परंतु युद्धादरम्यान ते एका बंकरमध्ये लपले होते आणि आम्हाला त्यांचे अचूक स्थान सापडले नाही. नाहीतर आम्ही त्यांना ठार मारले असते, असाही दावा त्यांनी केला.

इस्रायल काट्झ यांनी काय केला दावा?
रॉयटर्सच्या मते, काट्झ यांनी कान पब्लिक टीव्हीला सांगितले की, "जर खामेनी आमच्या नजरेत असते तर आम्ही त्यांना मारले असते." ते पुढे म्हणाले, "इराणी सर्वोच्च नेते एका अतिशय खोल बंकरमध्ये लपून बसले आहेत आणि कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक संकेत करत नव्हते. त्यांनी कमांडरशी देखील संपर्क तोडला होता. त्यामुळे खमेनी यांच्या हत्येची योजना पूर्ण होऊ शकली नाही, असा दावा त्यांनी केला.
मुलाखतीत इस्रायल काट्झ यांनी पुन्हा सांगितले की, संपूर्ण युद्धादरम्यान इस्रायलने खामेनींचा खूप शोध घेतला पण त्यांना ते सापडले नाहीत. इस्रायल काट्झ पुढे म्हणाले की इस्रायलचा उद्देश सत्ता बदलणे नव्हता, तर इराणचे नेतृत्व कमकुवत करणे आणि संघर्षादरम्यान दबाव निर्माण करणे हा प्रमुख उद्देश होता.
खामेनींची तुलना थेट हिजबुल्लाह नेत्याशी!
मुलाखतीत विचारले इस्रायल काट्झ यांना खामेनी यांच्यावरील हल्ल्यासाठी अमेरिकेकडून परवानगी मागितली होती का? असा सवाल करण्यात आला. त्यावर इस्रायल काट्झ यांनी उत्तर दिले, आम्हाला या गोष्टींसाठी परवानगीची आवश्यकता नाही.
काट्झ यांनी खामेनींची तुलना हिजबुल्लाह नेते हसन नसरल्लाहशी केली, ज्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता आणि त्यांनी इराणी नेत्याला लपून राहण्याचा सल्ला दिला. युद्धानंतर पहिल्यांदाच खामनेी दिसले.
26 जून रोजी युद्धानंतर पहिल्यांदाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी सार्वजनिकरित्या दिसले. खमेनी यांनी इराणच्या सरकारी टीव्हीवर एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कतारमधील अमेरिकन हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला करून इराणने "अमेरिकेच्या तोंडावर थाप मारली आहे".
यापूर्वी ते 19 जून रोजी दिसले होते. त्यांनी इस्रायलला इशाराही दिला होता की जर चिथावणी दिली तर इराण आणखी तीव्र प्रत्युत्तर घेऊ शकतो.
या संदेशात 86 वर्षीय खामेनी उत्साहाने भरलेले दिसले. 10 मिनिटांच्या या भावनिक भाषणात त्यांनी इस्रायल आणि अमेरिका दोघांनाही लक्ष्य केले.
अमेरिकेच्या हल्ल्यांना घाबरून खमेनी बंकरमध्ये लपले होते?
२२ जून रोजी अमेरिकेने आपल्या बी-२ बॉम्बरने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला, त्यानंतर सोमवारी (२३ जून) रात्री १० वाजता इराणने कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद हवाई तळावर प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे अनेक आखाती देशांमध्ये हवाई मार्ग बंद करण्यात आले. यानंतर इराणला आपल्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली, ज्यामुळे इराणने खमेनींना बंकरमध्ये लपवले. एवढेच नाही तर खमेनींनी त्यांचे सर्व संपर्कही तोडले. तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी एक गुप्त आणि विशेष युनिट तयार करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications