पेट्रोल किंमती वाढतील, सोनंही वाढणार.. पहा, इराण-इस्रायलच्या संघर्षाचा, भारताचा काय आहे तोटे?
Israel-Iran conflict : इस्रायल आणि इराणमध्ये सध्या टोकाचा संघर्ष सुरु आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. या दोघांमधील संघर्षामुळे भारतीय बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता, व्यक्त करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत हे युद्ध सुरु झाल्याने भारतीय बाजारपेठेतील अनेक वस्तू महाग होऊन खिशाला कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेअर मार्केटमध्येही गुरुवारी मोठा भूकंप येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.
कच्या तेलाच्या किंमती वाढतील
या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात. पेट्रोल आणि डिझेल कमी होईल, याच्या भारतीयांच्या आशा त्यामुळे मावळल्या आहेत. या संघर्षामुळे आयात- निर्यातीवर मोठा परिणाम होणार असून अर्थव्यवस्थेला आणि व्यापार दोन्हीला फटका बसेल. सोन्याचे दर वाढतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा अजेंडा यावरही मोठा परिणाम या संघर्षामुळे दिसू शकतो. भारत, मध्य पूर्व आणि युरोप दरम्यान बांधल्या जाणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (आयएमईसी) अजेंडाही अडकू शकतो. या प्रकल्पामुळे भारताचे सुएझ कालव्यावरील अवलंबित्व कमी होईल. सध्याच्या परिस्थितीमुळे भारताचा शिपिंग खर्च वाढू शकतो. त्यामुळे सहाजिकच अनेक उत्पादनांच्या किंमती वाढतील.

पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढतील
भारतीय बाजारपेठेत इराणकडून तेल आयात होते. मात्र युद्ध सुरु झाल्याने त्याचा परिणाम आयातीवर नक्कीच होईल. ज्या दिवशी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले त्याच दिवशी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 4 टक्क्यांनी वाढल्या. ही फक्त सुरुवात आहे, जर वातावरण आणखी बिघडले तर ही किंमत 150 ते 200 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. साहजिकच 85 टक्के कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या भारताच्या आयात बिलाचा बोजा वाढणार हे निश्चित आहे.
शेअर मार्केटवर किती होणार परिणाम?
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात इस्रायल आणि इराण संघर्षाचा परिणाम आज पाहायला मिळला. शेअर मार्केटमध्ये भूकंप आला आहे. या संघर्षामुळे मोठं नुकसान होत असताना आशियातील मार्केटवरही याचा परिणाम दिसून येणार आहे. या संघर्षामुळे सोन्याचे दर आताच वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोनं-चांदी दसऱ्याआधीच महाग होऊ शकतं. अमेरिकेतही शेअर मार्केट व्यवहारावरही परिणाम जाणवला. आज बुधवार असल्याने भारतीय शेअर मार्केट बंद आहे. मात्र गुरुवारी याचा मोठा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट उघडताच मोठा भूकंप येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications