महायुद्धाचा भडका: इराणचा ब्रिटीश हवाई तळावर हल्ला; सायप्रस हादरले, अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले
Israel Vs Iran War : इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज तिसरा दिवस असून या युद्धाने आता भीषण वळण घेतले आहे. इराणने आपल्या आक्रमणाची व्याप्ती वाढवत सायप्रसमधील ब्रिटीश रॉयल एअर फोर्स (RAF) अक्रोटिरी तळावर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे युद्धाची झळ आता युरोपीय देशांच्या लष्करी तळांपर्यंत पोहोचली असून जागतिक शांतता धोक्यात आली आहे.

सायप्रसमध्ये ब्रिटनला लक्ष्य करण्याचे कारण काय?
ब्रिटीश पंतप्रधान केअर स्टारमर यांनी अमेरिकेला इराणी क्षेपणास्त्र तळांवर हल्ले करण्यासाठी सायप्रसच्या या तळाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. याच चिडीतून इराणने अक्रोटिरी तळाला लक्ष्य केले. ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यात तळाचे किरकोळ नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, याला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटीश सैन्याने आता आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव
सोमवारी इराणने मध्यपूर्वेतील कुवेत, बहरीन, इराक आणि संयुक्त अरब अमिराती मधील किमान सहा अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले.
कुवेतमध्ये विमाने कोसळली: कुवेतमध्ये अमेरिकेची अनेक लढाऊ विमाने हवेत गोल फिरून जमिनीवर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी अमेरिकेच्या लष्करी सज्जतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
चर्चेला पूर्णविराम : "आम्ही अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाही," असे विधान इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांनी केले आहे, ज्यामुळे राजनैतिक मार्गाने युद्ध थांबण्याच्या आशा मावळल्या आहेत.
इराणमध्ये भीषण विनाश: ५५५ नागरिकांचा मृत्यू
अल-जझीराच्या अहवालानुसार, मागील तीस तासांत अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील 1,000 हून अधिक ठिकाणांवर तब्बल 2,000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. या हल्ल्यांचे स्वरूप अत्यंत विनाशकारी आहे:
शाळेवर हल्ला: एका शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १८० विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
एकूण बळी : आतापर्यंत इराणमध्ये ५५५ लोक ठार झाले असून ७४० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
सर्वोच्च नेत्याचा अंत : युद्धाच्या पहिल्याच दिवशी (२८ फेब्रुवारी) झालेल्या बॉम्बस्फोटात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याने इराण अधिकच आक्रमक झाला आहे.
इस्रायलचा 'सर्जिकल स्ट्राईक': दोन इराणी अधिकारी ठार
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दावा केला आहे की, त्यांनी इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील दोन बड्या अधिकाऱ्यांना अचूक टिपले आहे.
सय्यद याह्या हमीदी : इस्रायल व्यवहार विभागाचे उपमंत्री, जे परदेशात ज्यू आणि पाश्चात्य नागरिकांविरुद्ध कारवायांचे नियोजन करत होते.
जलाल पौर हुसेन : मंत्रालयाचे हेरगिरी विभाग प्रमुख. या दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या गुप्तचर यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे.
युद्धाचा भूगोल बदलणार?
एकूणच परिस्थिती पाहता, इराण आता केवळ इस्रायललाच नव्हे तर त्यांना साथ देणाऱ्या अमेरिका आणि ब्रिटनलाही थेट आव्हान देत आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी, जमिनीवरील वास्तव मात्र रक्ताने माखलेले दिसत आहे. जागतिक महासत्तांमधील हा संघर्ष आता तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications