Iran Attacked on Israel : इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ला , 150 क्षेपणास्त्रे डागली
Iran Attacked on Israel: इराणने 150 क्षेपणास्त्रे डागून इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. इराणने इस्रायलला टार्गेट करून क्षेपणास्त्रे डागल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. देशभरात हवाई हल्ल्यांनंतर सायरन वाजवले जात आहेत. रहिवाशांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट ही करण्यात येत आहे.
इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटलं आहे की, "काही काळापूर्वी इराणकडून इस्रायल राज्याच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत." जेरुसलेमसह संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवण्यात आले होते. इस्त्रायली लोकांना त्यांच्या मोबाईल फोनवर सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आदेश पाठवण्यात आले आहेत. या सोबतच याबाबतची घोषणा राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर जाहीर केली आहे.

एएफपीने व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "इराण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत अमेरिकेला मिळाले आहेत." या हल्ल्याविरुद्ध इस्रायलच्या बचावात्मक तयारीला आम्ही सक्रिय पाठिंबा देत असल्याचं, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
जेरुसलेमच्या काही भागांमध्ये तसेच मध्य इस्रायलमध्ये सायरन वाजत असल्याचे टीव्ही स्टेशनने नोंद केली आहे. लेबनॉनमधून रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या एका दिवसानंतर हा इशारा आला. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये मर्यादित जमिनीवर हल्ले सुरू केल्याचे सांगितले. अमेरिकेकडून इशारा दिल्यानंतर लगेचच इराणकडून हा हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, इराण इस्रायलवर "तात्काळ" बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. तसे केल्यास इस्लामिक रिपब्लिकला "गंभीर परिणाम" भोगावे लागतील, अशी धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.
युनायटेड स्टेट्स आणि इतर पाश्चात्य सहयोगी देशांनी एप्रिलमध्ये इराणने केलेल्या संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यापासून इस्रायलचा बचाव करण्यासाठी पाऊल उचलले, जे तेहरानने दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर इस्त्रायली हल्ल्याचा बदला म्हणून केले. इराणने इस्रायलवर थेट लष्करी हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम इराणवर होतील, असं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
दरम्यान लष्कराने जाहीर केले होते की, इराणकडून कोणताही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ला व्यापक असणे अपेक्षित आहे. असा हल्ला झाल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले होते. लेबनॉनमधील त्याच्या हिजबुल्लाशी संलग्न संघटनेच्या नेतृत्वाला हल्ल्यात ठार केल्यानंतर इराणने बदला घेण्याची शपथ घेतली.












Click it and Unblock the Notifications