न्यूयॉर्कचा ‘इंडिया डे परेड': विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना यांची ‘को-ग्रँड मार्शल्स' म्हणून निवड!
India Day Parade NYC 2025 : न्यूयॉर्कमध्ये 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या 43 व्या वार्षिक 'इंडिया डे परेड' मध्ये या वर्षी बॉलिवूडचे दोन लोकप्रिय चेहरे, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे 'को-ग्रँड मार्शल्स' म्हणून सहभागी होणार आहेत.
'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स' (FIA) ने आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमाची घोषणा अलीकडेच न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात करण्यात आली.
"सर्वे भवंतु सुखिनः" (सर्व सुखी असावेत) या विशेष संकल्पनेवर आधारित ही परेड मॅडिसन अव्हेन्यूवर आयोजित केली जाणार आहे, जे सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात एक सकारात्मक संदेश देईल.

'एफआयए'चा गौरवशाली इतिहास आणि योगदान
1970 मध्ये स्थापन झालेली 'एफआयए' ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था अमेरिकेत भारतीय संस्कृतीचा प्रचार, सामाजिक सहभाग आणि भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याचे काम करत आहे.
भारतीय राजदूत बिनया एस. प्रधान यांनी 'एफआयए'च्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले, की ''1981 मध्ये अत्यंत लहान प्रमाणात सुरू झालेली ही परेड आज जगातील सर्वात मोठी इंडिया डे सेलिब्रेशन परेड म्हणून ओळखली जाते.''

स्वातंत्र्यदिनाचा भव्य उत्सव
या वर्षीचा स्वातंत्र्यदिन सोहळा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, त्याचे विविध कार्यक्रम 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
- 15 ऑगस्ट, शुक्रवार : न्यूयॉर्कची ऐतिहासिक इमारत एम्पायर स्टेट बिल्डिंग भारतीय तिरंग्याच्या रंगात उजळून निघणार आहे.
- 16 ऑगस्ट, शनिवार : टाइम्स स्क्वेअर येथे भारतीय ध्वजवंदन समारंभ आयोजित केला जाईल. विशेष म्हणजे, याच ठिकाणी पहिल्यांदाच क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे, जो अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रिय बनवण्याच्या 'क्रिकमॅक्स कनेक्ट'च्या प्रयत्नांचा एक भाग आहे. 'क्रिकमॅक्स कनेक्ट' हे या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत.
- 17 ऑगस्ट, रविवार : दुपारी 12 वाजता मॅडिसन अव्हेन्यूवर मुख्य 'इंडिया डे परेड' सुरू होईल. या परेडमध्ये न्यूयॉर्कमधील इस्कॉनच्या वतीने काढण्यात येणारी रथयात्रा एक विशेष आकर्षण असेल. परेडनंतर 'सिप्रियानी वॉल स्ट्रीट' येथे 'इंडिपेन्डन्स ग्रँड गाला' आयोजित करण्यात आला आहे.
कलाकारांचे आवाहन आणि परेडची संकल्पना
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषांमध्ये विशेष संदेश देऊन लोकांना या उत्सवाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे.
'एफआयए'चे चेअरमन अंकुर वैद्य यांनी या कार्यक्रमाच्या सामुदायिक भावनेवर जोर देत सांगितले की, "या परेडचे संपूर्ण व्यवस्थापन स्वयंसेवकांद्वारे केले जाते, ज्यामुळे हा एक सामुदायिक सोहळा बनतो."
अध्यक्ष सौरिन परिख यांनी या परेडची वैशिष्ट्ये सांगताना म्हटले की, "ही परेड 'पैसे द्या आणि सहभागी व्हा' अशी नसून, 'अभिमानाने सहभागी होण्याची' संधी आहे, जी सर्वसमावेशकतेचे एक क्रांतिकारक पाऊल आहे."












Click it and Unblock the Notifications