'मला वाटतं आम्ही भारत आणि रशियाला गमावलंय'; डोनाल्ड ट्रम्प यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे वक्तव्य
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, भारत, रशिया आणि चीन या तीन महाशक्तींचे एकत्र येणे अमेरिकेच्या चिंतेत भर घालणारे ठरले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांनी थेट म्हटले आहे की, अमेरिकेने भारत आणि रशियाला चीनमुळे गमावले आहे.

ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट
ट्रम्प यांनी त्यांचे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रूथ सोशल' (Truth Social) वर एक पोस्ट शेअर करत हे वक्तव्य केले. त्यांनी लिहिले आहे की, "आपण भारत आणि रशियाला चीनच्या सर्वात खोल आणि अंधाऱ्या छावणीत गमावले आहे. आशा आहे की त्यांचे संबंध दीर्घकाळ समृद्ध राहतील." या पोस्टसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा एकत्र फोटो देखील पोस्ट केला आहे.
हे तिन्ही नेते नुकतेच शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेसाठी भेटले होते. या भेटीनंतरच ट्रम्प यांचे हे वक्तव्य आले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अमेरिका, रशिया, भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
US President Donald Trump writes on Truth Social, "Looks like we’ve lost India and Russia to deepest, darkest, China. May they have a long and prosperous future together!" pic.twitter.com/psIJcs8RhW
— ANI (@ANI) September 5, 2025
भारताची भूमिका आणि अमेरिकेची चिंता
गेल्या काही वर्षांपासून भारत आपली परराष्ट्र धोरणे अधिक स्वतंत्रपणे राबवत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले असले तरी, भारताने आपले राष्ट्रीय हित पाहून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरूच ठेवले आहे. यामुळे ट्रम्प यांना भारताची ही भूमिका डोळ्यात खुपत असल्याचे दिसून येते. ट्रम्प यांनी आपल्या 'टेरिफ वॉर' मध्ये भारतावर 25% पर्यंत कर लावले होते आणि काही प्रकरणांमध्ये दंड म्हणून आणखी 25% कर लादण्याची धमकी दिली होती.
ट्रम्प यांच्या वक्तव्यातून अमेरिकेची वाढती अस्वस्थता स्पष्टपणे दिसते. भारत एका बाजूला QUAD (क्वाड) सारख्या गटांमध्ये अमेरिकेसोबत काम करत आहे, तर दुसऱ्या बाजूला SCO आणि BRICS सारख्या मंचांवर रशिया आणि चीनसोबत आपली भागीदारी मजबूत करत आहे. भारताची ही संतुलित आणि बहु-ध्रुवीय परराष्ट्र नीती अमेरिकेला भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते, अशी भीती ट्रम्प यांना वाटते आहे.
ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबविल्याचा दावाही केला आहे, पण अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते त्यांचे हे दावे केवळ राजकीय स्वार्थासाठी आहेत.












Click it and Unblock the Notifications