कॉलेज ड्रॉपआउट ते 10 लाख कोटींचे साम्राज्य; 'या' बड्या उद्योजकाने घेतला जगाचा निरोप
इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे 91 व्या वर्षी निधन झाले आहे. जॉर्जियो हे जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड 'अरमानी' चे मालक होते. कधीकाळी कॉलेजमधून बाहेर पडलेल्या जॉर्जियो यांनी आपली मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर इतका मोठा फॅशन ब्रँड उभा केला. हा ब्रँड आजही श्रीमंती आणि प्रतिष्ठिततेचे प्रतीक मानला जातो.

अरमानी यांनी आपल्या मागे सुमारे 10 लाख कोटी रुपयांची संपत्ती सोडली आहे. विशेष म्हणजे, अरमानी यांचा व्यवसाय केवळ फॅशनपुरता मर्यादित नव्हता. फॅशन कंपनी म्हणून सुरूवात केल्यानंतर त्यांनी संगीत, क्रीडा आणि अगदी लक्झरी हॉटेल्सपर्यंत आपल्या ब्रँडचा विस्तार केला. अरमानी इटालियन बास्केटबॉल क्लब 'ओलंपिया मिलानो' चे मालक होते आणि त्यांनी इटलीच्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक संघांसाठी गणवेश देखील डिझाइन केले होते.
फॅशन ब्रँडची सुरुवात कधी झाली?
कॉलेज सोडून दिलेल्या जॉर्जियो अरमानींना फॅशनच्या जगातील एक महान व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांनी हाय-एंड मेन्सवेअरमध्ये मऊ आणि मिनिमलिस्टिक स्टाईलची नव्याने ओळख करून दिली. अरमानी यांनी सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण सोडून सैन्यात सेवा केली. त्यानंतर मिलानमधील 'ला रिनासेंते' या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदीदार आणि विंडो ड्रेसर म्हणून काम केले. नंतर, त्यांनी नीनो सेरुटीसाठी कपडे डिझाइन केले आणि शेवटी 1970 च्या दशकात आपला पार्टनर सर्जियो गैलोटी यांच्या मदतीने स्वतःचा ब्रँड सुरू केला.
अरमानींना यश कसे मिळाले?
अरमानींच्या फॅशन व्यवसायाला खरी गती 1980 च्या 'अमेरिकन गिगोलो' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून मिळाली. यात त्यांना अभिनेता रिचर्ड गियरच्या कपड्यांचे डिझाइन करण्याची संधी मिळाली. यानंतर, त्यांनी अॅक्सेसरीज, परफ्यूम, मेकअप आणि स्पोर्ट्सवेअर तसेच इंटिरिअर डिझाइन, रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सपर्यंत आपला व्यवसाय विस्तारला. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 12.1 अब्ज डॉलर, म्हणजेच अंदाजे 10 लाख कोटी रुपये होती.
अरमानींचा 10 अब्ज डॉलरचा वारसा कोणाला मिळणार?
अरमानींना कोणताही मुलगा किंवा मुलगी नव्हती. त्यांच्या सर्वात जवळची त्यांची भाची रॉबर्टा होती, जी त्यांच्या जनसंपर्क संचालक (पब्लिक रिलेशन्स डायरेक्टर) म्हणून काम करत होती. रॉबर्टाने अनेक वर्षांपासून ब्रँड आणि सेलिब्रिटीज यांच्यात दुवा साधून अरमानींचे नाव जागतिक स्तरावर मजबूत केले. 2006 मध्ये, रॉबर्टाने हॉलीवूड स्टार टॉम क्रूझ आणि केटी होम्स यांच्या लग्नाचे आयोजन केले होते, ज्यासाठी अरमानी यांनी कपडे डिझाइन केले होते. अरमानी यांनी पुरुष कपड्यांच्या टीममधील लिओ डेल'ऑर्को आणि महिलांच्या लाइनमधील सिल्व्हाना अरमानी यांच्यावर आपला वारसदार म्हणून विश्वास व्यक्त केला होता.
जॉर्जियो अरमानी यांनी फॅशन, व्यवसाय आणि जागतिक शैलीच्या जगात आपले नाव कायमचे कोरले आहे. त्यांच्या जाण्याने फॅशन उद्योगात एका युगाचा अंत झाला, परंतु त्यांचा ब्रँड आणि त्यांची शैली नेहमी जिवंत राहील.












Click it and Unblock the Notifications