राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा शपथ; उच्चारले फक्त 'हे' ३५ शब्द
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री साडेदहा वाजता ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जेडी वन्स यांचीही शपथ
राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होण्यापूर्वी उपराष्ट्रपती म्हणून जेडी वन्स यांनी शपथ घेतली. १९५५ मध्ये आईने जे बायबल दिले होते, त्याच बायबलवर हात ठेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेत दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त ३५ शब्दांत ही शपथ घेतली.
फक्त ३५ शब्दांत शपथ
अमेरिकेच्या राष्ट्रपतींची शपथ ही फक्त ३५ शब्दांची असते. आज डोनाल्ड ट्रम्प यांनीही फक्त ३५ शब्दांत शपथ घेतली. "मी शपथ घेतो की मी युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार निष्ठापूर्वक करीन. आणि माझ्या क्षमतेनुसार, संविधानाचे जतन, संरक्षण आणि रक्षण करीन." अशी शपथ ट्रम्प यांनी घेतली.
७०० पाहुण्यांची उपस्थिती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला ७०० पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.












Click it and Unblock the Notifications