भारत-पाकिस्तान युद्धावरील पंतप्रधान मोदींचा दावा ट्रम्प यांनी फेटाळला, काय म्हणाले US प्रेसिडेन्ट?
Donald Trump on India-Pakistan War and Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याबाबत पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भारतातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संसदेत केलेल्या विधानानंतर आता पुन्हा मोदींचा दावा खोटा ठरला, असा निशाणा विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या सततच्या दाव्यांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळे भारत-पाकिस्तान युद्धाबाबतची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली. यामुळे मोदी सरकारवर विरोधकांचा दबाव सातत्याने वाढणार असून सरकारला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे.

मोदींचा दावा विरुद्ध ट्रम्प यांचा दावा
काल (२९ जुलै रोजी) भारतीय संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी कोणत्याही देशाचा किंवा जागतिक नेत्याचा दबाव नव्हता; उलट, सर्व देशांनी भारताला पाठिंबा दिला होता.
मात्र, मोदींच्या या विधानाला १२ ते १५ तास उलटत नाहीत तोच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध त्यांच्या सल्ल्याने थांबवण्यात आले. ट्रम्प यांनी आतापर्यंत किमान २६ वेळा हा दावा केला आहे, ज्यामुळे मोदींच्या संसदेतील विधानावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
#WATCH यह पूछे जाने पर कि क्या भारत 20-25% के बीच उच्च टैरिफ़ चुकाने वाला है, अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, "हाँ, मुझे ऐसा लगता है। भारत मेरा मित्र है। उन्होंने मेरे अनुरोध पर पाकिस्तान के साथ युद्ध समाप्त कर दिया... भारत के साथ ट्रेड डील अभी संपन्न नहीं हुई है। भारत… pic.twitter.com/0mBaBVTBs4
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2025
विरोधकांकडून मोदींवर हल्लाबोल
ट्रम्प यांच्या या ताज्या दाव्यानंतर 'इंडिया' आघाडीने पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर मोदींना जाहीर आव्हान दिले होते की, जर त्यांच्यात इंदिरा गांधींच्या ५० टक्केही 'दम' असेल, तर त्यांनी ट्रम्प खोटारडे असल्याचे जाहीरपणे सांगावे. मात्र, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प किंवा चीनचा थेट उल्लेख करण्याचे टाळले.
भारतावरील कर व व्यापार करारावर ट्रम्प काय म्हणाले?
"भारत २०-२५ टक्के उच्च कर भरणार आहे का?" या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "हो, मला असे वाटते. भारत माझा मित्र आहे. त्यांनी माझ्या विनंतीवरून पाकिस्तानसोबतचे युद्ध संपवले." ट्रम्प यांनी भारताला 'एक चांगला मित्र' म्हटले असले, तरी भारताने इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त कर आकारले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया १ ऑगस्ट रोजी कर अंमलबजावणीच्या तारखेपूर्वी आली आहे. मात्र, ट्रम्प यांनी शुल्क लादण्याबाबत भारताला कोणतेही पत्र पाठवले नाही, जसे त्यांनी इतर अनेक देशांसाठी केले होते. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी १०० हून अधिक देशांवर कर लादला होता आणि त्यानंतर भारतावर २६ टक्के कर लादला होता, जो नंतर ९० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला.
'भारत आमच्या वस्तूंवर कर लादणार नाही'
१७ जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, लवकरच अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल आणि इंडोनेशियाच्या सूत्रांनुसार, भारतातील अमेरिकन उत्पादनांवरही शून्य कर लादला जाईल. "आम्ही अनेक देशांशी करार केले आहेत. आमचा आणखी एक करार होणार आहे, कदाचित भारतासोबत. आम्ही चर्चा करत आहोत. जेव्हा मी पत्र पाठवेन तेव्हा तो करार होईल," असे ट्रम्प म्हणाले होते.
भारत-अमेरिका व्यापार करार; अमेरिकन पथक येणार!
द्विपक्षीय व्यापार कराराच्या (BTA) सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकन अधिकारी २५ ऑगस्ट रोजी भारताला भेट देतील. दोन्ही देश सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत व्यापार करारांचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
यासोबतच, अंतरिम व्यापार कराराची शक्यता देखील तपासली जात आहे. व्यापार करारावरील चर्चेचा शेवटचा टप्पा वॉशिंग्टनमध्ये पार पडला होता, जिथे भारताचे मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी चर्चा केली होती.












Click it and Unblock the Notifications