जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले!
Donald Trump vs Japan PM : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या अनपेक्षित विधानांसाठी ओळखले जातात. नुकत्याच व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीत ट्रम्प यांनी जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्यासमोर ऐतिहासिक 'पर्ल हार्बर' हल्ल्याचा संदर्भ दिल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण आणि पेचप्रसंगाचे बनले होते.

नेमकं घडलं काय?
इराणवरील अमेरिकन हल्ल्यांपूर्वी मित्र राष्ट्रांना (जपान आणि युरोपीय देश) पूर्वसूचना का दिली नाही? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी लष्करी मोहिमेत 'गोपनीयता' आणि 'सरप्राईज' (आश्चर्याचा धक्का) किती महत्त्वाचे असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान त्यांनी जपानच्या १९४१ मधील पर्ल हार्बर हल्ल्याचा संदर्भ देत म्हटले की, "जपानला 'सरप्राईज'चे महत्त्व इतरांपेक्षा जास्त चांगले ठाऊक आहे. मग त्या ऐतिहासिक हल्ल्यापूर्वी जपानने अमेरिकेला माहिती का दिली नव्हती?".
पंतप्रधान ताकाइची यांची प्रतिक्रिया
ट्रम्प यांच्या या विधानानंतर ताकाइची यांच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात मावळले. त्या काही काळ अस्वस्थ दिसल्या आणि त्यांच्या देहबोलीतूनही आश्चर्य व्यक्त होत होते. वास्तविक, ही बैठक दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, मात्र या एका विधानामुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्याचे पाहायला मिळाले.
मैत्रीपूर्ण संबंधांवर भर
या प्रसंगाने थोडा तणाव निर्माण झाला असला, तरी दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला. ट्रम्प यांनी ताकाइची यांचे कौतुक करताना त्यांना एक 'विलक्षण' नेत्या म्हटले. तर, ताकाइची यांनीही अमेरिका-जपान भागीदारी मजबूत असल्याचे सांगत सहकार्यावर भर दिला.
रणनीतिक चर्चा
- या बैठकीत केवळ इतिहासच नाही, तर वर्तमानातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.
- होर्मुझची सामुद्रधुनी: ट्रम्प यांनी जपानला आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.
- चीनवर संतुलित भूमिका: ताकाइची यांनी चीनसोबत संवाद सुरू ठेवण्यावर आणि जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर भर दिला.
पर्ल हार्बर हल्ल्याचा थोडक्यात इतिहास
७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नौदल तळावर अचानक हल्ला केला होता, ज्यानंतर अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली होती. आज दोन्ही देश मित्र असले तरी हा विषय आजही संवेदनशील मानला जातो.












Click it and Unblock the Notifications