Donald Trump: 350% टॅरिफ बॉम्बची धमकी देत मी भारत-पाक युद्ध थांबवले!; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले!
Donald Trump Claims Stopping India Pakistan war : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक दावा केला आहे. 350% पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी देऊन आपण भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध थांबवले, असा दावा करून खळबळ उडवली. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि व्यापार यावर ट्रम्प यांचे दावे सातत्याने भारताच्या भूमिकेशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मोदी यांनी आम्ही कोणाचेही ऐकूण युद्ध थांबवले नाही असे म्हटले, तर दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाक युद्ध आपणच थांबविल्याचा दावा केला आहे.
युद्ध समाप्तीचा 'ट्रम्प' कॉल
बुधवारी अमेरिका-सौदी गुंतवणूक मंचात बोलताना ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान तणावाच्या जुन्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, दोन्ही देशांमध्ये तणाव असताना त्यांनी मध्यस्थी केली.
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा मला पहिला फोन आला. त्यांनी माझे आभार मानले आणि सांगितले की, मी लाखो लोकांचे जीव वाचवले. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला, मोदी म्हणाले, "आम्ही संपवले, मी विचारले, "तुम्ही काय संपवले?" त्यावर मोदींनी उत्तर दिले, "आम्ही युद्ध करणार नाही." दुसरी बाब म्हणजे, ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी केल्याचा दावा यापूर्वीही ६० हून अधिक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे.

भारताची भूमिका: 'तिसऱ्या पक्षाचा सहभाग नाही'
या दाव्यावर भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. भारताने सातत्याने असे म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी किंवा तणाव कमी करण्याच्या कोणत्याही करारामध्ये कोणताही तिसरा देश सहभागी नव्हता. दोन्ही देशांमध्ये थेट चर्चेनंतरच हा करार झाला होता.
टॅरिफचे 'ब्रह्मास्त्र' : 250% ते 350%
ट्रम्प यांच्या मते, त्यांनी केवळ धमकी देऊन हे युद्ध थांबवले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर २५०% आयात शुल्क लादण्याची धमकी दिली होती. त्यांच्या ताज्या दाव्यानुसार, त्यांनी ३५०% टॅरिफची धमकी दिली होती. ही धमकी दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत दोन्ही बाजूंनी फोन करून युद्धबंदीवर सहमती दर्शवली, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. या कॉल दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांचेही 'शक्तिशाली योद्धा' म्हणून कौतुक केले.
भारत-अमेरिकेचे 'अद्भुत' संबंध
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे आपले संबंध चांगले असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे अद्भूत संबंध आहेत. ट्रम्प यांनी भारत हा जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आणि सर्वात मोठा देश असल्याचे नमूद केले. तसेच, भारत हा इंडो-पॅसिफिक प्रदेशात एक महत्त्वाचा आर्थिक आणि धोरणात्मक सुरक्षा भागीदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टॅरिफ कमी करण्याची घोषणा!
१० नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका एका नवीन व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या जवळ आहेत आणि अमेरिका भारतावर लादलेले शुल्क हळूहळू कमी करेल. "ते आता माझ्यावर प्रेम करत नाहीत, पण ते पुन्हा माझ्यावर प्रेम करतील. आम्हाला एक चांगला करार मिळत आहे."
रशियन तेल खरेदीवरील दंड
ट्रम्प यांनी यापूर्वी भारतावर एकूण ५०% टॅरिफ लादले होते. यात २५% परस्पर कर (Reciprocal Tariff) आणि रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल २५% दंड यांचा समावेश होता. भारताने रशियन तेल खरेदी लक्षणीयरीत्या कमी केली असल्यामुळे अमेरिकेवरील कर कमी केले जातील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने हे आर्थिक निर्बंध लादले होते. भारताच्या तेल खरेदीतून मिळणारा पैसा रशिया युक्रेनमधील युद्धासाठी वापरतो, असा ट्रम्प यांचा दावा होता.












Click it and Unblock the Notifications