असीम मुनीर यांचा 'दावोस'मधील तो Video व्हायरल; चिलखताच्या आवरणाखाली लष्करप्रमुखांचे शौर्य की भीती?
Asim Munir Bulletproof Jacket Video : जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) 2026च्या बैठकीसाठी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे पोहोचलेले पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर सध्या जगभरात चर्चेचा आणि उपहासाचा विषय बनले आहेत.
निमित्त ठरले आहे ते म्हणजे, जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असलेल्या दावोसमध्येही त्यांनी घातलेले बुलेटप्रूफ जॅकेट. त्यांच्या कोटखाली स्पष्टपणे दिसणाऱ्या या सुरक्षा कवचामुळे "पाकिस्तानी लष्करप्रमुखांना स्वतःच्या जीवाची इतकी भीती वाटते का?" असा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला जात आहे.

दावोसमध्ये बुलेटप्रूफ जॅकेटची गरज काय?
दावोस हे शहर जागतिक राजनैतिक संबंधांसाठी अत्यंत शांत आणि सुरक्षित मानले जाते. येथे जगभरातील राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज नेते कोणत्याही अतिरिक्त सुरक्षा कवचाशिवाय मुक्तपणे वावरताना दिसतात. मात्र, जनरल मुनीर यांचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यास त्यांच्या सूटखालील संरक्षणात्मक चिलखताचा फुगवटा स्पष्टपणे जाणवतो.
तज्ज्ञांच्या मते, हे पाऊल लष्करप्रमुखांच्या शौर्याच्या दाव्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे. एका लष्करी प्रमुखाला सुरक्षित आंतरराष्ट्रीय मंचावरही असुरक्षित वाटावे, हे त्यांच्या तीव्र मानसिक दबावाचे लक्षण मानले जात आहे.
Pakistani Field Marshal Asim Munir spotted wearing a bulletproof jacket during his high-profile DAVOS visit. The CBPJ NIJ IIIA + STAB1 meant for pistol fire and stabbing says it all, a man so insecure at home that he fears for his life even abroad. pic.twitter.com/Kaq1CT87Bi
— Global Watch (@Globalwatchh) January 25, 2026
'अंडरवेअरही बुलेटप्रूफ आहे का?'
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा महापूर आला आहे. "जनरल मुनीर यांनी हेल्मेटही घालायला हवे होते," अशा खोचक टिप्पण्या नेटकरी करत आहेत. काहींनी त्यांच्या 'शौर्या'ची थट्टा केली आहे. सोशल मीडियावरील हा विनोद केवळ वैयक्तिक नसून, पाकिस्तानी जनतेचा लष्करी आस्थापनेबद्दल असलेला वाढता राग आणि ढासळलेला आदर दर्शवतो.
पाकिस्तानमधील अस्थिरता अन् मृत्यूची भीती
जनरल मुनीर यांच्या या असुरक्षिततेमागे पाकिस्तानमधील सध्याची स्थिती कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) कडून मिळणाऱ्या धमक्या आणि लष्करी नेतृत्वाविरुद्ध वाढलेला जनक्षोभ यामुळे मुनीर मानसिकदृष्ट्या हादरले आहेत. देशांतर्गत राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना स्वतःच्या सावलीचीही भीती वाटत असल्याचे चित्र या बुलेटप्रूफ जॅकेटमुळे निर्माण झाले आहे.
गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश
पाकिस्तान जागतिक आर्थिक मंचावर परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गेला होता. मात्र, ज्या देशाचे रक्षक (लष्करप्रमुख) स्वतःला सुरक्षित मानत नाहीत आणि चिलखताच्या आवरणात लपून फिरतात, त्या देशात गुंतवणूकदार पैसे लावण्यास कसे धजावतील?
असीम मुनीर यांची ही 'भीती' पाकिस्तानच्या जागतिक विश्वासार्हतेवर आणि आर्थिक राजनैतिकतेवर एक मोठा डाग ठरली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी जॅकेट वापरणे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो, परंतु जागतिक व्यासपीठावर यामुळे पाकिस्तानची प्रतिमा "असुरक्षित देश" म्हणून अधिक गडद झाली आहे.












Click it and Unblock the Notifications