भाजपला पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार?, 'या' तीन महिला नेत्यांच्या नावाची रंगलीय चर्चा!
BJP President Latest News in Marathi : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकदा पक्षाच्या वरिष्ठ पातळीतील नेत्यांपैकीच एखाद्या नेत्याची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, अशी चर्चा असतानाच आता पक्ष पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला सर्वोच्च पद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजप महिला नेतृत्वाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलणार आहे, ज्याची तयारी देखील केली जात आहे.
जेपी नड्डा 2020 पासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपला, परंतु त्यांचा कार्यकाळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढविण्यात आला. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे पक्ष नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची तयारी करत आहे. जरी हे महत्त्वाचे पद कोण भूषवेल याबद्दल सस्पेंस असला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाला पहिल्यांदाच महिला अध्यक्ष देखील मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपला पहिली महिला अध्यक्ष मिळेल का?, ही तीन नावे चर्चेत!
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, तीन प्रमुख महिला नेत्या - निर्मला सीतारमण, दग्गुबती पुरंदेश्वरी आणि वनती श्रीनिवासन या तीन महिला अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपचे शीर्ष नेतृत्व याबाबत काय निर्णय घेणार, हे येत्या काळातच कळणार आहे. परंतु, पहिली महिला अध्यक्ष देण्याचा मानस भाजपचा असल्याचे बोलले जात आहे.
🔹 निर्मला सीतारामण
सध्याच्या अर्थमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांना सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहे. अलिकडेच त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासोबत पक्ष मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक घेतली.
दक्षिण भारतात भाजपच्या विस्ताराच्या दृष्टीने तामिळनाडूमधील त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि प्रभावी नेतृत्व क्षमता महत्त्वाची मानली जाते. जर त्या अध्यक्ष झाल्या तर महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ पक्षाचा हा एक मजबूत संदेश असेल.

🔹 डी. पुरंदेश्वरी (दग्गुबती पुरंदेश्वरी)
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या आंध्र प्रदेश युनिट अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी हे देखील प्रमुख दावेदार आहेत. त्या अनेक भाषांमध्ये अस्खलित आहेत आणि त्यांना व्यापक राजकीय अनुभव आहे.
भारत सरकारच्या "ऑपरेशन सिंदूर" मोहिमेतही त्या सहभागी होत्या, ज्या युरोपातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताच्या दहशतवादविरोधी धोरणांचे प्रतिनिधित्व करत होत्या.
🔹वनथी श्रीनिवासन
तामिळनाडूतील कोइम्बतूर (दक्षिण) येथील आमदार असलेल्या वकिलीतून राजकारणी झालेल्या वनाथी श्रीनिवासन देखील या पदासाठी चर्चेत आहेत. त्या 1993 पासून भाजपशी संबंधित आहेत आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम करत आहेत.
2021 मध्ये, त्यांनी अभिनेता कमल हासन यांचा पराभव करून विधानसभेची जागा जिंकली. 2022 मध्ये, त्यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले, ज्यामुळे त्या या समितीतील पहिल्या तमिळ महिला ठरल्या.
1993 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्यापासून, वनाथी श्रीनिवासन यांनी राज्य सचिव, सरचिटणीस आणि तामिळनाडूच्या उपाध्यक्षासह अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
🔸 भाजप महिला चेहरा का शोधत आहे?
अलिकडच्या काळात, विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये महिला मतदारांकडून भाजपला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. याशिवाय, पक्षाने 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर केले,
ज्यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद आहे. अशा परिस्थितीत, महिला अध्यक्षाची नियुक्ती पक्षाची रणनीती आणि सामाजिक संदेश दोन्ही मजबूत करू शकते.
संघाकडूनही मिळाला सिग्नल!
सूत्रांनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील महिला अध्यक्षाच्या कल्पनेला मान्यता दिली आहे. यावरून स्पष्ट होते की पक्ष आता महिला नेतृत्वाकडे धोरणात्मक वाटचाल करत आहे. अलिकडच्या निवडणुकीत, महिला मतदारांनी भाजपचा विजय सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,
विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये. जर भाजपने हे पाऊल पुढे टाकले, तर इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाईल.
भाजपचे आतापर्यंतचे अध्यक्ष अन् त्यांचा कार्यकाळ..!
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना 1980 मध्ये झाली. तेव्हापासून, पक्षाच्या अनेक नेत्यांनी हे सर्वोच्च पद भूषवले आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची संपूर्ण यादी खाली दिली आहे.
१. अटलबिहारी वाजपेयी (1980 ते 1986)
२. के.एल. अडवाणी (1980-1990, 1993-1998, 2004-2005)
3. मुरली मनोहर जोशी (1991-1993)
4. कुशाभाऊ ठाकरे (1998-2000)
5. बंगारू लक्ष्मण (2000-2001)
६. के जना कृष्णमूर्ती (2001-2002)
7. एम व्यंकय्या नायडू (2002-2004)
8. नितीन गडकरी (2010-2013)
9. राजनाथ सिंह (2005-2009) (2013-2014)
10. अमित शहा (2014-2017, 2017-2020)
11. जेपी नड्डा (2020 ते आत्तापर्यंत...)












Click it and Unblock the Notifications