दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण?, उद्या सकाळी 11.30 वा. मंत्रिमंडळ बैठक, CM नावावर होईल शिक्कामोर्तब
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या म्हणजेच मंगळवारी उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेतील आणि त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. उपराज्यपालांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना मंगळवारी दुपारी 4.30 वाजता भेटण्याची वेळ दिली आहे.
त्याआधी उद्या सकाळी 11.30 वाजता आम आदमी पार्टीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यामध्ये दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
उद्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा?
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक नेते सीएम केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. आज संध्याकाळी आम आदमी पार्टीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही सुरू झाली आहे. यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या भावी रणनीतीवर चर्चा होत आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नावावर अद्याप चर्चा झालेली नाही. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?
13 सप्टेंबर रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असून त्यात आतिशी सिंह, सुनीता केजरीवाल आणि सौरभ भारद्वाज यांची नावे ठळकपणे घेतली जात आहेत.
उनकी साज़िशें हमारे चट्टान जैसे हौसलों को नहीं तोड़ पाईं, हम फिर से आपके बीच में हैं। हम देश के लिए यूँ ही लड़ते रहेंगे, बस आप सब लोगों का साथ चाहिए। https://t.co/o5mBn8vOx3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 15, 2024
2013 पासून केजरीवालांचे सरकार
दिल्लीतील केजरीवाल सरकारचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे आणि केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 2013 पासून दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आहे. 4 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीत एकूण 70 जागांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या, ज्यामध्ये भाजप 32 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र, त्यांना बहुमत मिळाले नाही. त्यानंतर आम आदमी पार्टीला 28 आणि काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या 49 दिवसांनंतर दोन्ही पक्षांची युती तुटली आणि केजरीवाल यांचे सरकार पडले.
यानंतर 7 फेब्रुवारी 2015 रोजी दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या, ज्यामध्ये आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकल्या. भाजप केवळ तीन जागांवर घसरला. पाच वर्षांनंतर, 8 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकूण 70 जागांपैकी 62 जागा जिंकल्या, तर 8 जागा भाजपच्या वाट्याला गेल्या.
उद्या दुपारी एलजींना भेटणार केजरीवाल
दिल्ली एलजी कार्यालयानुसार, दिल्लीचे एलजी व्हीके सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात उद्या दुपारी 4.30 वाजता एलजी सचिवालयात बैठक होणार आहे. या बैठकीतच अरविंद केजरीवाल राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र काल केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकांसोबत नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याची मागणी केली होती. माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनीही आपण लोकांमध्ये जाणार आणि पुन्हा निवडणूक जिंकल्यानंतरच सर्वोच्च पदावर परतणार असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ 'आप'चे प्रमुख नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा हा कार्यकाळ काही महिन्यांपुरताच असला तरी, प्रमुख मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडू शकणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्वमान्य असणारा प्रमुख नेता निवडण्याची 'आप' नेतृत्वाची इच्छा आहे.












Click it and Unblock the Notifications