सुटकेसमध्ये जिचा मृतदेह आढळला ती हिमानी नरवाल कोण होती, राहुल गांधींशी काय संबंध?, हत्यामागे कोण?
Himani Narwal : राहुल गांधींसोबत 'भारत जोडो' यात्रेत दिसलेल्या 22 वर्षीय हिमानी नरवालचा मृतदेह रोहतक बस स्टँडजवळ महामार्गाच्या कडेला एका सुटकेसमध्ये आढळला. काँग्रेस महिला कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या बातमीने केवळ रोहतकमध्येच नाही तर हरियाणामध्येही खळबळ उडाली आहे.
रोहतक जिल्ह्यातील सांपला बस स्टँडजवळ रोहतक-दिल्ली रस्त्याच्या कडेला एका बेवारस निळ्या सुटकेसमध्ये हिमानी नरवालचा मृतदेह आढळला. जेव्हा रस्त्याने जाणाऱ्यांना बेवारस सुटकेस दिसली तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यात मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. हिमानी नरवालचा मृतदेह सुटकेसमध्ये होता.
हिमानी नरवाल कोण होती?
22 वर्षीय हिमानी नरवाल ही सोनीपतमधील कथुरा गावची रहिवासी होती. गेल्या महिन्यापासून रोहतकमध्ये एकटीच राहत होती. हिमानी ही एक कंटेंन्ट निर्माती देखील होती. हिमानीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 14.6 हजार फॉलोअर्स आहेत. हिमानीचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत राहिले. डिजिटल निर्मात्या असण्यासोबतच, हिमानी नरवाल काँग्रेस कार्यकर्त्या देखील होती. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील ती त्यांच्यासोबत दिसली होती.

सोमवारी या प्रकरणाला एकाला केली अटक
हरियाणातील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये टाकण्यात आला. सोमवारी पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक केली. ज्याची ओळख सचिन म्हणून झाली आहे. आरोपी बहादूरगडचा रहिवासी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमानीची हत्या तिच्याच घरात करण्यात आली.
ज्या सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह सापडला ती सुटकेस देखील हिमानीच्या घरची होती. खुनी हा हिमानीचा ओळखीचा आहे. आरोपींकडून हिमानीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सीआयए 2 च्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे.
आरोपीने रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने असा दावा केला आहे की, तो हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि ती त्याला ब्लॅकमेल करत होती. शिवाय, लाखो रुपयेही उकळण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येईल.
राहुल गांधीसोबतचा फोटोही व्हायरल झाला
काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. ही हत्या देशात चर्चेचा विषय आहे. हिमानीच्या आईने खून करून मृतदेह फेकून दिल्याचा आरोप केला होता. हिमानी नरवाल गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसशी संबंधित होत्या. त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचाही भाग होत्या. ती रोहतकमध्ये या प्रवासात सामील झाली आणि श्रीनगरपर्यंत गेली. भारत जोडो यात्रेदरम्यान, हिमानीचा राहुल गांधींसोबतचा फोटोही व्हायरल झाला.
हिमानीच्या आईने केला मोठा दावा
हिमानी नरवाल खून प्रकरणावर तिच्या आईचेही त्यावर विधान आले. ती म्हणाली, "मला खात्री आहे की आरोपी तिच्या ओळखीचा कोणीतरी असेल, पार्टीतील कोणीतरी असेल, तिच्या कॉलेजमधील कोणीतरी असेल किंवा आमच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी असेल. फक्त तेच घरी येऊ शकतात.
मला खात्री आहे की कोणीतरी तिच्याशी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तिने प्रतिकार केला, ज्यामुळे हे घडले. तिला काहीही चुकीचे सहन होत नव्हते. मला आरोपीला मृत्युदंड हवा आहे. सरकारकडून अद्याप कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, असेही त्या काही माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications