सावधान..! तुमचे WhatsApp कधीही होऊ शकते हॅक; हॅकर्स असा चोरताहेत डेटा? सरकारने काय दिला इशारा? वाचा
सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअॅपही आहे. मात्र आता याच व्हाट्सअॅप वापरकर्त्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारत सरकारने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक धोक्याचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये आढळलेल्या एका गंभीर बगमुळे ही चेतावणी देण्यात आली आहे. मेटा कंपनीचे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये ही त्रुटी आढळून आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने हा अलर्ट जारी केला आहे.

कुणाला आहे धोका?
CERT-In च्या मते WhatsApp डेस्कटॉप आवृत्ती वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी धोक्याची पातळी खूप जास्त आहे. एजन्सीने व्हॉट्सअॅप डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उच्च-तीव्रतेचा इशारा जारी केला आहे. जे वापरकर्ते संगणक किंवा लॅपटॉपवर WhatsApp चालवत आहेत आणि WhatsApp डेस्कटॉपची आवृत्ती 2.2450.6 पेक्षा जुनी आहे, त्यांच्या सिस्टमवर हॅकर्सचा हल्ला होण्याचा धोका जास्त असतो, असा इशारा देण्यात आला आहे.
नेमका काय आहे धोका?
या बगमुळे हॅकर्स तुमच्या डिव्हाइस आणि व्हॉट्सअॅप अॅपमध्ये प्रवेश मिळवू शकतात. CERT-In ने अहवाल दिला आहे की WhatsApp डेस्कटॉप अॅप्लिकेशनमध्ये तांत्रिक भेद्यता आहे, जी फाइल उघडण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. यामध्ये, MIME प्रकार आणि फाइल एक्सटेंशनमध्ये जुळत नसल्यामुळे WhatsApp काही अटॅचमेंट योग्यरित्या ओळखू शकत नाही. या त्रुटीचा फायदा घेत, हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये धोकादायक फाइल्स सामान्य फाइल्ससारख्या बनवून पाठवू शकतात. अशी फाइल उघडताच, तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो आणि तुमचे खाते देखील हॅक होऊ शकते.
काय बाळगावी सावधानता?
- CERT-In ने सल्ला दिला आहे की WhatsApp डेस्कटॉप वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांनी त्यांचे अॅप्लिकेशन त्वरित अपडेट करावे.
- कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा.
- अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजना उत्तर देऊ नका.
- प्रत्येक अपडेटसह WhatsApp अॅप्लिकेशनची नवीन आवृत्ती त्वरित स्थापित करा.
- CERT-In ने असे सुचवले आहे की वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाइस अँड्रॉइड आवृत्ती १३, १४ किंवा १५ वर त्वरित अपडेट करावे.
- असत्यापित स्त्रोतांकडून अॅप्स डाउनलोड करणे टाळावे.












Click it and Unblock the Notifications