केंद्रीय अर्थसंकल्प 2025: शेतकऱ्यांना काय मिळेल? पिक विमा, किसान सन्मान निधीबाबत अपेक्षा वाढल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील या अर्थसंकल्पाकडून अनेकांना अपेक्षा लागल्या आहेत. मोदी सरकार सामान्यांसाठी काय देणार व शेतकऱ्यांसाठी काय देणार, यावर सध्या अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. शेतीची आर्थिक गणित साध्य करण्यासाठी मोदी सरकार या अर्थसंकल्पात काही विशेष घोषणा करु शकतं, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.

मोदींचा दुसरा अर्थसंकल्प
मोदींच्या तिसऱ्या टर्ममधला हा त्यांचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. मोदी सरकारने गेल्यावेळीही ९ घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केलेले दिसले. त्यातही शिक्षण, शेती, युवक, रोजगार यांना प्राधान्य दिलेले दिसले. आताही मोदी सरकारचा २०२५ सालातला अर्थसंकल्प हा शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी विशेष काहीतरी घेऊन येईल, अशी शक्यता व्यक्त केल जात आहे.
शेतकऱ्यांचा विचार होईल
मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो. शेतकरी आंदोलनामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करु शकते, असंही काहींचं म्हणणं आहे. किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी सहा-सहा हजार रुपये मिळत होते. आता ही रक्कम आठ हजारांपर्यंत वाढवली जावू शकते. संसदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने १७ डिसेंबरला लोकसभेत सादर केलेल्या अहवालात ती वाढवून १२ हजार रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती. ती शिफारस मोदी सरकार लागू करेल, असे दिसत आहे.
पिक विमाही वाढणार
यंदाच्या अर्थसंकल्पात पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली जावू शकते. कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत या योजनेचा लाभ सांगितला होता. त्यामुळे सरकार या योजनेतही बदल करु शकते, असे तज्ज्ञांचं मत आहे. संसदेच्या स्थायी समितीनेही तशी शिफारस केली आहे. दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना युनिव्हर्सल क्राँप स्कीमची सुविधा मिळू शकते.
आधारभूत किमती ठरणार
याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून अनेक पिकांच्या आधारभूत किमती ठरवून देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात त्यावरही काही घोषणा होऊ शकते. किटकनाशके, खते यांच्याबाबतही काहीतरी मोठ्या घोषणा होतील, असेही सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications