पत्नीला आणायला निघाले, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं; विजय रुपाणी यांचं दु्र्दैवी निधन
अहमदाबादहून लंडनमधील गॅटविककडे जाणारी फ्लाईट AI171 आज दुपारी उड्डाण घेतल्यानंतर अपघातग्रस्त झाली. दुपारी 1:38 वाजता अहमदाबादहून उड्डाण करणाऱ्या या फ्लाईटमध्ये बोईंग 787-8 ड्रीमलायनर प्रकारचं विमान वापरण्यात आलं होतं.

या विमानात एकूण 242 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते. या अपघातात विजय रुपाणी यांच दुर्दैवी निधन झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विजय रूपाणी कोण होते?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारच्या यंगोन (येनगोन) शहरात झाला होता. त्यांच्या आईचं नाव मायाबेन तर वडिलांचं नाव रमणिकलाल रूपाणी आहे. सात भावंडांमध्ये विजय हे सगळ्यात लहान आहेत. 1960 साली म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचं कुटुंब भारतात आलं आणि गुजरातमधील राजकोटमध्ये स्थायिक झालं.
विजय रूपाणी यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबी पदवी घेतली. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आहे जो इंजिनिअर आहे आणि एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
राजकीय कारकीर्द
विजय रूपाणी हे गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री होते. त्यांनी 2016 ते 2021 या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते भाजपकडून राजकोट वेस्ट मतदारसंघातून आमदार होते. त्याआधी ते राज्यसभेचे खासदारही होते.
शालेय वयातच विजय रूपाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य झाले. 1971 मध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंध आला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच ते पक्षाशी सक्रिय राहिले. 1976 च्या आणीबाणीच्या काळात त्यांना 11 महिने तुरुंगवास झाला.
1996-97 मध्ये ते राजकोटचे महापौर होते. 1998 मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचा सचिव नेमण्यात आलं. 2006 मध्ये गुजरात पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्याच काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते (2006-2012).
2013 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे अध्यक्ष झाले. 2014 मध्ये त्यांनी राजकोट वेस्ट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आणि आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात वाहतूक मंत्री झाले. 2016 मध्ये ते भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष बनले आणि त्याच वर्षी 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. 2017 मध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आणि रूपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं.
लंडनला का निघाले होते विजय रूपाणी?
मिळालेल्या माहितीनुसार, विजय रूपाणी यांच्या पत्नी अंजली रूपाणी या सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांना परत घेण्यासाठीच विजय रूपाणी लंडनकडे रवाना झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. गुजरातमधील माजी मंत्री भूपेंद्रसिंह चूड़ासमा यांनी सांगितलं की, रूपाणी यांचा गुजरात विद्यापीठात एक कार्यक्रम होता.
तिथून परत आल्यानंतर ते जेवत होते, तेव्हा त्यांनी टीव्ही सुरू केला. त्याचवेळी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या फ्लाईटच्या क्रॅश झाल्याची बातमी आली. ते क्षणभर हादरले, कारण त्यांना माहिती होतं की विजय रूपाणी हे याच फ्लाईटने लंडनला जाणार आहेत. मात्र, त्यांना नक्की खात्री नव्हती की ते विमानात होते की नाही. त्यांनी लगेच टीव्ही बंद केला आणि गांधीनगरमधील विजय रूपाणी यांच्या निवासस्थानी पोहोचले. विजय रूपाणी यांचा सीट नंबर 2D असल्याची माहिती समोर आली आहे.












Click it and Unblock the Notifications