Ahmedabad Plane Crash अहमदाबाद विमान दु्र्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
गुजरातच्या अहमदाबाद शहरात मंगळवारी दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाच्या बोईंग प्रकारच्या प्रवासी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच मेघाणीनगर भागात ते कोसळलं. या विमानात 232 प्रवासी व 10 क्रू मेंबर्स होते आणि सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनकडे जाण्यासाठी रवाना झालं होतं. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत मेघाणीनगर परिसरात आकाशात प्रचंड धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान जोरात आवाज करत झपाट्याने खाली आलं आणि एका रहिवासी इमारतीवर कोसळलं. यामुळे त्या इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
This plane barely took off and crashed just seconds after leaving the Ahemdabad runway.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) June 12, 2025
Never seen a more horrific and strange #PlaneCrash in my life.
Shivering after watching these visuals. pic.twitter.com/EX0pQvBauZ
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते, असा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनास्थळावर तात्काळ अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानाचा मोठा भाग जळून खाक झाला आहे, तर काही तुकडे परिसरात विखुरलेले आढळले.
शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, आपत्कालीन सेवा सज्ज करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस, एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथकांनी बचाव कार्य सुरू केलं आहे.
सोशल मीडियावर या दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, अपघातस्थळावरून आकाशात उठणारा धूर आणि जळालेली विमानाची छायाचित्रे पाहून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने या घटनेची प्राथमिक माहिती दिली असून, अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा मानवी चूक यापैकी कोणता घटक कारणीभूत ठरला, हे तपासानंतरच समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली असून, पोलिसांकडून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications