मोठी बातमी! 'युपीएससी'चे अध्यक्ष डॉ. मनोज सोनी यांचा राजीनामा
दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीचे अध्यक्ष डॉ. मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्याला अजून पाच वर्षे शिल्लक असताना राजीनामा दिला.

या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची माहिती पुढे येत आहे.
सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता
मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता, त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. सोनी 2017 मध्ये UPSC सदस्य म्हणून रुजू झाले. 16 मे 2023 रोजी त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांना गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा असलेल्या अनुपम मिशनसाठी अधिक वेळ द्यायचा आहे.
वैयक्तिक कारणांमुळे सोनी यांचा राजीनामा
2020 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर, ते मिशनमध्ये साधू किंवा निष्काम कर्मयोगी बनले. मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आयएएस पूजा खेडकर यांच्याशी संबंधित नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तीनवेळा कुलगुरू राहिलेल्या डॉ.सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. 2005 मध्ये ते देशातील सर्वात तरुण विद्यापीठाचे कुलगुरू बनले.
सोनी वयाच्या 40 व्या वर्षी कुलगुरू
मनोज सोनी हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. मोदींनी 2005 मध्ये सोनी यांची वडोदराच्या एमएस युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली होती, असेही सांगितले जाते. नियुक्तीवेळी सोनी यांचे वय अवघे ४० वर्षे होते. केंद्रीय लोकसेवा आयोगात रुजू होण्यापूर्वी सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून तीन वेळा काम केले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मनोज सोनी यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. सोनी यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती म्हणजे संविधानावर हल्ला असल्याचे राहुल यांनी म्हटले होते. त्यांनी सोनी यांचे आरएसएसच्या जवळचे वर्णन केले होते. मनोज सोनी अध्यक्ष झाल्याचा अर्थ यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी केंद्रीय प्रचारक संघ आयोग होईल, असे काँग्रेस नेत्याने म्हटले होते.
पूजा खेडकर प्रकरण अन् अध्यक्षांचा राजीनामा
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या प्रकरणावरून सध्या बराच गदारोळ सुरू आहे. प्रशिक्षणार्थी आयएएल पूजा खेडकर यांनी खोटे कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. पालकांचे नाव, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण केली आहे.
यूपीएससीने खेडकर यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. या वादातच यूपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीनाम्यानंतर सोनी यांना आपला वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा असलेल्या अनुपम मिशनसाठी घालवायचा आहे. अशा परिस्थितीत त्यांचा पूजा खेडकर वादाशी काहीही संबंध नाही असेही सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications