GPay, PhonePe सह इतर अँप बंद; UPI सिस्टीमला नेमकं काय झालं? कसा बसला फटका? वाचा...
तांत्रिक बिघाडामुळे लोकप्रिय पेमेंट सिस्टम असलेली UPI सेवा शनिवारी बंद पडली. त्यामुळे हजारो वापरकर्त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. युपीआय बंद पडण्याची गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी वेळ आहे. UPI मध्ये बिघाड झाल्यामुळे व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. UPI नेटवर्कच्या कामकाजासाठी जबाबदार असलेली संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही समस्या मान्य केली. हा व्यत्यय दूर करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

१५ दिवसांत तीनदा व्यत्यय
युपीआय सेवेला यापूर्वी २६ मार्चला व्यत्यय आला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी UPI बिघाड झाल्याची नोंद झाली होती. वापरकर्त्यांच्या अहवालांवर आधारित सेवा व्यत्ययांवर लक्ष ठेवणाऱ्या आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरनुसार सकाळी ११:३० नंतर UPI बिघाडाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही एक त्वरित पेमेंट प्रणाली आहे जी RBI-नियमित संस्था NPCI द्वारे विकसित आणि व्यवस्थापित केली जाते. एनपीसीआयने मान्य केले की वापरकर्त्यांना व्यवहारांमध्ये अंशतः घट होत आहे आणि ते ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे.
एनपीसीआय काय म्हणते?
वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे वापरकर्त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय ने मान्य केले. एनसीपीआयने ट्विट करत या समस्येबाबत वक्तव्य केले. एक्सवर म्हटले आहे की, "एनपीसीआय सध्या अधूनमधून तांत्रिक समस्यांना तोंड देत आहे. ज्यामुळे यूपीआय व्यवहारात अंशतः घट झाली आहे. आम्ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. याबाबतचे अपडेट देत राहू. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते." असे एनपीसीआयने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनेकांना बसला फटका
स्थानिक दुकानांमध्ये लहान पेमेंटसाठी युपीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याला किमान व्यवहार मर्यादा नसल्याने युपीआय चांगलेच लोकप्रिय झाले आहे. याव्यतिरिक्त UPI ऑटोपे वैशिष्ट्य देते. जे वापरकर्त्यांना बिलांसाठी आवर्ती पेमेंट सेट करण्यास अनुमती देते आणि सबस्क्रिप्शन व्यवहारांना सुलभ आणि त्रासमुक्त बनवते. मार्चमध्ये UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी २४.७७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. जो मागील महिन्याच्या तुलनेत १२.७% वाढलेला दिसला. फेब्रुवारीमध्ये UPI व्यवहार मूल्य २१.९६ लाख कोटी रुपये होते.












Click it and Unblock the Notifications