तीन विमान अन् एका ट्रेनला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबईत उडाली खळबळ, प्रशासनाकडून तपासणी सुरू
मुंबई विमानतळावरुन जाणाऱ्या तीन विमानांना व मुंबई हावडा एक्सप्रेस मेलला बॉम्बने उडवून दिले जाईल, सगळीकडे रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरण व रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. सदर विमानांची तपासणी केली गेली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याची पुष्टी देण्यात आलेली आहे.परंतु, या घटनेने मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एअर इंडियानंतर आज मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे इंडिगो विमान आणि मुंबई-हावडा मेलला बॉम्बने उडवून दिले जाणार अशी धमकी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विमान ताबडतोब एका वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आणि ऑपरेटिंग प्रक्रियेनुसार त्याची तपासणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रवाशांना मदत आणि अल्पोपहार प्रदान करण्यात आला आणि त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो.

सोमवारी (14 ऑक्टोबर) मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन विमानांमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली होती. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जाणार आहे. माहिती मिळताच विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. हे विमान सध्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उभे आहे. विमानात 239 प्रवासी होते.
दुसरी फ्लाइट इंडिगोची 6E-1275 आहे, ती मुंबईहून मस्कतला जाणार होती. तिसरी फ्लाइट इंडिगोची 6E 56 आहे. ते मुंबईहून जेद्दाहला जात होते. या दोन्ही विमानांना विलगीकरणात ठेवून त्यांची तपासणी केली जात आहे. सध्या सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई-हावडा मेललाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, तपासणीनंतर सदर गाडी रवाना करण्यात आली आहे.
पाच दिवसांत धमकीची दुसरी घटना...!
गेल्या पाच दिवसांत विमानात बॉम्बची धमकी देण्याची ही दुसरी घटना आहे. 9 ऑक्टोबरलाही लंडनहून दिल्लीला गेलेल्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK18 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. विमान दिल्लीला पोहोचण्याच्या सुमारे 3.5 तास आधी, एका प्रवाशाने विमानाच्या टॉयलेटमध्ये एक धोकादायक टिश्यू पेपर पाहिला. त्यांनी क्रू मेंबरला माहिती दिली. विमानात सुमारे 300 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. सुरक्षा तपासणीमुळे प्रवासी तब्बल 5 तास विमानतळावर अडकून पडले होते.












Click it and Unblock the Notifications