काल 3 तर आज 5 आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली-शिकागो प्लेन कॅनडात उतरवले
मुंबईहून उड्डान भरणाऱ्या तीन विमानांना बॉम्बने व मुंबई हावडा एक्सप्रेसला उडवण्याची धमकी सोमवारी मिळाली होती. त्यानंतर आता अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी देखील 5 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या आल्या. एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो या विमानाचा देखील उड्डाणांमध्ये समावेश होता. यानंतर त्या विमानाला कॅनडाकडे वळवण्यात आले. त्यानंतर इकालुइट विमानतळावर उतरले. येथे प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली आहे.
फ्लाइट 24 रडारनुसार, विमानाने आज पहाटे 3 वाजता दिल्लीहून उड्डाण केले आणि ते दुपारी 4:30 वाजता शिकागोला पोहोचणार होते. दिवसभरात 5 उड्डाणे धोक्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी अनेक विमानतळांवर दहशतवादविरोधी कारवाया केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पाच विमानांना बॉम्बच्या धमकीचे संदेश मिळाले, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अनेक विमानतळांवर विशेष काळजी घेतली. दरम्यान, सोमवारी मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांनाही बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे शेकडो प्रवाशी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, चौकशीअंती ह्या धमक्या फेक असल्याचे समोर आले आहे.
14 ऑक्टोबर रोजी 3 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या
14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. ते दिल्लीकडे वळवण्यात आले. दुसरी फ्लाइट इंडिगोची होती, जी मुंबईहून मस्कतला जात होती. तिसरे विमान जेद्दाहहून मुंबईला जात होते.
7 दिवसांत तिसऱ्यांदा धमकी
याआधी 9 ऑक्टोबरला लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK18 फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली होती. विमान दिल्लीला पोहोचण्याच्या सुमारे 3.5 तास आधी, एका प्रवाशाने विमानाच्या टॉयलेटमध्ये एक धोकादायक टिश्यू पेपर पाहिला. त्यांनी क्रू मेंबरला माहिती दिली. विमान दिल्लीत उतरले आणि त्याला आयसोलेशन करण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांचे सामान तपासले गेले.
मात्र, बॉम्बसारखे काहीही सापडले नाही. या प्रकरणातील महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे बॉम्बची माहिती असलेले टिश्यू पेपर सापडल्यानंतरही विमान तब्बल साडेतीन तास हवेत उडत राहिले. बॉम्बची माहिती असतानाही विमान दिल्लीत का आणले, असा सवाल पोलिसांनी क्रू मेंबर्सना केला.
विमान उतरवण्याची परवानगी जवळच्या देशातच घेतली जाऊ शकते, असे पोलिसांच्या प्रश्नावर वैमानिक आणि चालक दलातील सदस्यांनी सांगितले की, विमानाचे उड्डाण मार्गातच लँड केले तर त्याचे अपहरण होण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठी विमान थेट दिल्लीला आणण्यात आले.












Click it and Unblock the Notifications