तेजप्रताप यादव पुन्हा आरजेडीत? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा करत अनुष्का यादवसोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.

या घोषणेनंतर लालू यादव यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करत कुटुंब आणि पक्षातून निष्कासित केल्याची माहिती स्वतः सोशल मीडियावरून दिली होती. परंतु आता तेजप्रताप यांनी पुन्हा एकदा 'X' (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर एक राजकीय पोस्ट शेअर करत पुन्हा पक्षात पुनरागमन झाल्याच्या चर्चांना हवा दिली आहे.
आरजेडीच्या पोस्टरसोबत नीतीश कुमारांवर टीका
तेजप्रताप यादव यांनी आपल्या 'X' हँडलवरून नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिले, "२० वर्षांच्या NDA सरकारकडे आपलं काम दाखवण्यासारखं काही नाही, त्यामुळे ३५ वर्षांपूर्वीच्या सरकारच्या १५ वर्षांचा दोष देणारे आधी स्वतःच्या २० वर्षांचं उत्तर द्यावं." या पोस्टसोबत त्यांनी #Bihar #TejPratapYadav #नया_बिहार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे #RJD हे हॅशटॅग वापरले आहेत. यासोबतच त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये RJD च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलचा समावेशही आहे.
20 वर्षों की एनडीए सरकार के पास अपने काम काज का हिसाब देने के लिए कुछ नहीं है इसलिए 35 साल पहले बनी सरकार के 15 साल का रोना रोने वाले पहले अपने 20 साल का हिसाब दें। #Bihar #RJD #TejPratapYadav #नया_बिहार pic.twitter.com/6hcL3IR3F7
— Tej Pratap Yadav (@TejYadav14) May 30, 2025
या गोष्टीवरूनच राजकीय वर्तुळात असा अंदाज व्यक्त केला जात आहे की तेजप्रताप यांची RJD मध्ये पुन्हा एंट्री झाली आहे की काय? यावर मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र तेजप्रताप यादव यांच्या या कृतीमुळे RJD कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
प्रेमसंबंधावरून वडिलांचा रोष, पण तेजप्रताप ठाम
तेजप्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते, "मी तेजप्रताप यादव आणि माझ्यासोबत या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती अनुष्का यादव आहे. आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेम करतो. आम्ही १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. ही गोष्ट मी खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायची होती, पण कसं सांगावं कळत नव्हतं. आज या पोस्टद्वारे माझं मन मोकळं करत आहे. आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल."
या पोस्टनंतर लालू प्रसाद यादव यांनी कडक पाऊल उचलत तेजप्रताप यांना सार्वजनिकरित्या पक्ष आणि कुटुंबातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. ही घटना बिहारच्या राजकारणात मोठा धक्का मानली गेली होती.
राजकीय पुनरागमनाची शक्यता
तेजप्रताप यादव यांनी सोशल मीडियावर पुन्हा RJD संदर्भित पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या पुनरागमनाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ही केवळ वैयक्तिक राजकीय भूमिका आहे की पक्षाच्या सहमतीने उचललेलं पाऊल - याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र तेजप्रताप यांनी आपलं राजकीय अस्तित्व पुन्हा जपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे हे नक्की.
यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या परिवारात सध्या सुरू असलेला तणाव, तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यातील मतभेद, तसेच RJD च्या आगामी राजकीय धोरणांवर काय परिणाम होईल, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications