दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोक घराबाहेर पळाले, रिश्टर स्केलवर 4.3 इतकी नोंद
Earthquake in Delhi-NCR : दिल्लीत सोमवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले.
भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजली गेली. त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 KM खोलीवर असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले.
काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवू लागली. पहाटे 5.36 वाजता हा भूकंप झाल्याची माहिती आहे, त्यामुळे लोकांची झोप उडाली.भूकंपाचे हादरे बसताच लोकांमध्ये घबराट पसरली आणि खबरदारी म्हणून ते तात्काळ घराबाहेर पडले.

दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. सुदैवाची बाब म्हणजे सध्या कुठूनही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते, ज्यामुळे येथे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो. दिल्ली एनसीआरमध्ये वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत. अनेक दशकांनंतर भूकंपाचा केंद्रबिंदूही दिल्लीजवळ आहे.
An earthquake with a magnitude of 4.0 on the Richter Scale hit New Delhi at 05:36:55 IST today
— ANI (@ANI) February 17, 2025
(Source - National Center for Seismology) pic.twitter.com/KXIw8qRO6T
लोक घाबरुन घराबाहेर
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, हे भूकंपाचे धक्के पहाटे ०५:३६ वाजता जाणवले. त्याचे केंद्र दिल्लीच होते, ज्याची खोली ५ किमी होती. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला. अनेक वर्षानंतर भूकंपाचे केंद्र दिल्लीच्या जवळ होते. दिल्ली हे भूकंपाचे केंद्र असल्याने येथील लोकांना बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले
अहवालानुसार, दिल्लीसह इतर अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, सहारनपूर, मथुरा आणि आग्रा यासारख्या अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील कुरुक्षेत्र, हिसार आणि कैथल येथील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्ली पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जारी केला
दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपानंतर, दिल्ली पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि एक हेल्पलाइन नंबर जारी केला. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लोक ११२ क्रमांकावर संपर्क साधू शकतात. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका असा सल्ला दिला आहे.












Click it and Unblock the Notifications