"अफवा पसरत आहेत! उपराष्ट्रपती धनखड यांचा ठावठिकाणा कुठेय? सांगा" संजय राऊतांचे अमित शहांना पत्र
Sanjay Raut's letter to Amit Shah where is Jagdeep Dhankhar :देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते नेमके कुठे आहे हे अद्याप समजलेले नाही. ते अचानक एकाएकी कुठे आहेत, गायब झाले की काय असा सवाल विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तर सत्ताधाऱ्यांनी आरोग्याचा मुद्दा उपस्थित करुन उपराष्ट्रपतींना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे असाही विरोधकांचा आरोप आहे. आता संजय राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांना एक पत्र लिहीले आहे.

उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करणारे हे पत्र आहे, यात संजय राऊत यांनी जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची पत्रातून मागणी केली आहे.
काय आहे संजय राऊत यांचे पत्र?
संजय राऊत यांनी पत्रातून म्हटले की, "मी आपल्याला हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. देशाचे उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरत आहेत, ज्यामुळे आम्ही सर्वजण चिंतीत आहोत.
दिनांक २१ जुलै रोजी संसदेच्या कामकाजादरम्यान राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवण्यात आले. यामागचे कारण सभापतींच्या प्रकृती अस्वास्थ्याचे असल्याचे सांगण्यात आले. ही एक सामान्य घटना आहे, परंतु त्यानंतर घडलेल्या काही गोष्टी अधिक धक्कादायक आणि चिंताजनक आहेत." असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
जगदीप धनखड यांचा ठावठिकाणा कुठे आहे?
संजय राऊत पत्रात पुढे म्हणतात की, "गेल्या २१ दिवसांपासू धनखड यांच्या ठिकाणाबद्दल आणि त्यांच्या आरोग्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. दिल्लीतील राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या अफवा सुरू आहेत की त्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले गेले आहे आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे."
..तर राज्यसभा सदस्य सर्वोच्च न्यायालयात जातील
संजय राऊत म्हणाले, "उपराष्ट्रपती देशातील एक महत्त्वपूर्ण घटनात्मक पद आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असणे आवश्यक आहे. ही बाब केवळ राज्यसभा सदस्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. काही राज्यसभा सदस्य या गंभीर परिस्थितीमुळे त्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत."
उपराष्ट्रपतींच्या ठावठिकाणांबद्दल माहिती द्या
संजय राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी, तुमच्याकडून अधिकृत आणि खरी माहिती मिळावी हीच माझी अपेक्षा आहे. मला आशा आहे की आपण माझ्या भावना समजून घ्याल आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सध्याच्या ठिकाणाबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दलची खरी माहिती देऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम द्याल."












Click it and Unblock the Notifications