RBI च्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा; पहा कोण आहेत आणि यापूर्वी कोठे होते..?
New RBI Governor- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी केंद्र सरकारने IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली. संजय मल्होत्रा हे सध्या महसूल विभागाचे सचिव आहेत. त्यांची आता आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कशामुळे झाली मल्होत्रा यांची निवड?
शक्तिकांत दास हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 ला म्हणजेच मंगळवारी संपत आहे. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी नव्या गव्हर्नरची नियुक्ती केली जाते. त्यानुसार आज संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली. संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत. ते बुधवारपासून म्हणजेच 11 डिसेंबर 2024 पासून रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी आपल्या हातात घेतील. त्यांच्या आतापर्यंतच्या विस्तृत अनुभवाचा आरबीआयच्या आर्थिक धोरणांवर चांगला आणि सकारात्मक प्रभाव पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे संजय मल्होत्रांची कारकीर्द?
संजय मल्होत्रा हे राजस्थान कॅडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवीही त्यांनी घेतलेली आहे. संजय मल्होत्रा यांचे प्रशासकीय सेवेते मोठे नाव आहे. त्यांनी आतापर्यंतच्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते.
मल्होत्रा होते महसूल विभागात सचिव
संजय मल्होत्रा हे सध्या अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून काम पाहत होते. याआधी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवले आहे. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहे त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.












Click it and Unblock the Notifications