सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढल्या; EDकडून मोठी कारवाई, जाणून घ्या संपूर्ण केस
Robert Vadra ED chargesheet : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती तसेच कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने दावा केला आहे की, वाड्रा यांनी गुरुग्राममधील एका जमीन व्यवहारातून 58 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई केली.

काय आहे नेमका आरोप?
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाड्रा यांनी गुरुग्राममध्ये ३.५ एकर जमीन लाच म्हणून घेतली. यासाठी त्यांनी ७.५ कोटी रुपये दिले होते. नंतर ही जमीन डीएलएफ (DLF) कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकण्यात आली.
या व्यवहारातून मिळालेल्या रकमेपैकी 5 कोटी रुपये ब्लू ब्रीझ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (BBTPL) आणि 53 कोटी रुपये स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड (SLHPL) या कंपन्यांद्वारे कमावले गेले.
या दोन्ही कंपन्या वाड्रा यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीचा आरोप आहे की, ही रक्कम गुन्ह्यातून मिळवलेली आहे. वाड्रा यांनी या पैशांचा वापर मालमत्ता खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि कंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी केला.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण हरियाणातील गुरुग्राममधील शिकोहपूर गावात जमीन खरेदी-विक्री आणि परवाने जारी करण्यात झालेल्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी हरियाणा पोलिसांनी गुरुग्राममधील खेरकी दौला पोलिस ठाण्यात यासंदर्भात एफआयआर दाखल केला होता.
या एफआयआरमध्ये रॉबर्ट वाड्रा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा, डीएलएफ आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह अनेकांवर फसवणूक, कट रचणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ईडीने वाड्रा यांच्या काही मालमत्ता देखील जप्त केल्या होत्या. आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications