Raja Raghuvanshi Case :मंगळसूत्रामुळे सोनमची क्रूरता समोर आली, राजाची हत्या झाल्यावर थेट...
शिलाँगमध्ये गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणात आरोपी सोनम रघुवंशीसह इतर चार जणांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आरोपींना शिलाँग सदर पोलिस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा पुराव्याने या खुनाच्या रहस्यावर प्रकाश पडला आहे - आणि तो पुरावा होता सोनमचं मंगळसूत्र.
मंगळसूत्राने खुलासा केला...
ही घटना सुरुवातीला अपहरण आहे की अपघात, हे पोलिसांनाही स्पष्ट नव्हतं. २ जून रोजी वायजे डोंग भागात राजाचा मृतदेह आढळल्याने चौकशीला वेग आला. घटनास्थळ पाहून सुरुवातीला पोलिसांना अपघाताची शक्यता वाटली होती. पण त्याचवेळी राजाची पत्नी सोनम बेपत्ता असल्याचं लक्षात आलं.
तपास पुढे नेताना पोलिसांनी सोनम राहत असलेल्या शिप्रा स्टे होमची झडती घेतली असता तिची बॅग सापडली. या बॅगेत सोनमचं मंगळसूत्र आढळलं आणि याच क्षणी पोलिसांचा संशय वाढला. लग्नाच्या काही दिवसांतच मंगळसूत्र गळ्यात नसणं हे असामान्य वाटल्याने पोलिसांचा लक्ष सोनमकडे वळलं.
हत्या अपघात नव्हे, तर नियोजित कट
पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असता, मृतदेहाजवळच हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही सापडलं. यामुळे राजाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून, ठरवून केलेली हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
इतकंच नाही तर, हनीमूनसाठी बाहेर पडलेल्या सोनमने तीन दिवसांतही सोशल मीडियावर एकही फोटो पोस्ट न केल्याचं लक्षात आलं. आजच्या काळात कपल हनिमून फोटो शेअर करतात, पण येथे असा कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांचा संशय आणखी वाढला.
सीसीटीव्ही फुटेजने दिला अंतिम पुरावा
राजाच्या हत्येच्या ठिकाणापासून सुमारे १० किमी अंतरावर सोनम आणि एका अनोळखी पुरुषाचा सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला. पुढील तपासात उघड झालं की तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्ट किलर होता. या दोघांनी वेगवेगळ्या दिशेने स्थलांतर केल्याचेही पोलिसांनी नोंदवले.
यामुळे पोलिसांच्या दृष्टीने या गुन्ह्यामागे कोणी तिसरं नसून, सोनमचच मुख्य नियोजन असल्याचं निश्चित झालं. तिचे कॉल डिटेल्स, हालचाली, आणि पुरावे पोलिसांना तिच्याच दिशेने घेऊन गेले.
पाचही आरोपी पोलीस कोठडीत
या खून प्रकरणात मेघालय पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे. सोनमसह सर्व आरोपींना ११ जून रोजी शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना ८ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून, पुढील चौकशीसाठी पोलिसांना मोकळीक मिळाली आहे.












Click it and Unblock the Notifications