आईसाठी आता लेक मैदानात..! प्रियंका गांधी म्हणाल्या, माझ्या आईचं स्टेटमेंट तोडून-फोडून दाखवलं...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झाले. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त सभागृहासमोर भाषण केलं. त्यांचे भाषण सुमारे ४९ मिनिटे चाललं. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली. बिचाऱ्या राष्ट्रपती अर्थात पुअर लेडी, असं सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींनी उद्देशून म्हटल्यानंतर आता भाजप व राष्ट्रपती भवनानेही सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आता आई सोनिया गांधी यांना वाचविण्यासाठी त्यांची मुलगी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या आहेत.

काय म्हणाल्या सोनिया गांधी
राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यावर सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी मीडियाला थेट उत्तर दिलं नाही. मात्र नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना दिसले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. सर्व खोटी आश्वासने दिली आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तर राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग म्हटलं. त्यावर पुअर लेडी असं सोनिया गांधी म्हणाल्या. राष्ट्रपती शेवटी शेवटी तर थकून गेल्या होत्या. त्या मोठ्या महत्प्रयासाने बोलत होत्या, असा चिमटाही सोनिया गांधी यांनी काढला.
राष्ट्रपती भवनाचं उत्तर
सोनिया गांधी यांच्या विधानानंतर राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी यांचं विधान दुर्देवी आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर टिका करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या भाषणात राष्ट्रपती थकल्या नव्हत्या, असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिपण्णीमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिपण्ण्या या दुर्देवी असून त्या टाळता येतात, असंही राष्ट्रपती भवनानं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी
सोनिया गांधी यांच्यावर भाजपने जोरदार निशाणा साधला. सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. यावर प्रियंका गांधींनीही प्रतिउत्तर दिले. त्या म्हणाल्या, देशाला बुडविणाऱ्या भाजपने पहिल्यांदा माफी मागावी. माझी आई ही ७०-८० वर्षांची आहे. राष्ट्रपतींनी खूप लांबलचक भाषण केल्यानंतर माझ्या आईने फक्त त्या बिचाऱ्या थकल्यात असं म्हटलं होतं. वास्तविक भारताच्या राष्ट्रपतींचा त्याच काय आम्ही सर्व सन्मान करतो. मात्र माझ्या आईची टिपण्णी मीडियाने तोडून-फोडून दाखवली. राष्ट्रपतींचा अपमान करण्याची सोनिया गांधी यांची इच्छा नव्हती, असंही प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications